मुंबई हादरली… कायद्याचा धाकच उरला नाही! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, दरवाजा बंद करण्याच्या वादातून विरारच्या मयंक लोहारला चाकूने भोसकले

मुसळधार पाऊस सुरू असताना धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार घडला. ट्रेनचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये माथेफिरू तरुणाने सहप्रवासी असलेल्या 22 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. हादरवून टाकणारी ही घटना मंगळवारी रात्री अंधेरी-बोरिवली स्थानकांदरम्यान घडली. मृत तरुणाचे नाव मयंक लोहार असे असून तो विरार येथे राहत होता. मयंकवर चाकूचे वार केल्यानंतर लोकल बोरिवली स्थानकातील फलाटाला लागताच हल्लेखोर रोशन सुवर्णा उतरून फरार झाला. पोलिसांनी 15 तास कसून शोध घेत पनवेल येथून माथेफिरू रोशनच्या मुसक्या आवळल्या. या हत्याकांडामुळे कायद्याचा कुणालाच धाक उरला नसल्याचे समोर आले आहे.

मयंक लोहार हा अंधेरी पश्चिमेकडील वेस्टसाईड स्टोअरमध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री काम संपवून तो विरार-भोईरपाडा येथील घरी परतत होता. रात्री 10.42 वाजता मयंकने अंधेरी स्थानकातून नालासोपारा लोकल पकडली. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तो दरवाजाजवळ उभा होता. इतक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. त्यामुळे मयंकने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारीच उभा असलेला रोशन सुवर्णा या आडदांड प्रवाशाने त्याला विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर रोशन सुवर्णाने खांद्यावरील बॅगेमधून धारदार चाकू काढून थेट मयंकच्या पोटावर आणि छातीवर एकापाठोपाठ एक सपासप तीन ते चार वार केले. या हल्ल्यात मयंक लोकलच्या दरवाजाजवळच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती समजताच बोरिवली रेल्वे पोलीस लोकल ट्रेनमध्ये आले. पोलिसांनी मयंकला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या भयंकर घटनेप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरू करण्यात आला. तपासासाठी लोहमार्ग पोलिसांची सात पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी 400 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजची कसून तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी अखेर पनवेल स्थानकातून रोशनच्या मुसक्या आवळल्या.

उपचारादरम्यान मृत्यू

रात्री 11.04 वाजता लोकल बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर येताच आरोपी रोशन सुवर्णा हा ट्रेन पूर्ण थांबण्याआधीच उतरून पळून गेला. जखमी मयंकला प्राथमिक तपासणीनंतर त्याला पुढील उपचारांसाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

400 सीसीटीव्ही तपासले

सुवर्णा हा बोरिवलीतून रिक्षा पकडून मीरा-भाईंदरला त्याच्या घरी गेला. त्यानंतर रात्री तो कुर्ला येथे गेला. तेथून तो पनवेलला पळाला. बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम खुपे यांनी त्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले. पोलिसांनी त्याच्या घरच्यांची चौकशी केली असता सुवर्णा हा उत्तर प्रदेशात गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर तब्बल 400 सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेण्यात आला.

माझ्या मुलाला का मारले? मयंकच्या आईवडिलांचा टाहो

तुमच्या मुलावर हल्ला झाला आहे. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात त्याला नेण्यात आले आहे, असा फोन रात्री मयंकचे वडील रमेश लोहार यांना आला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जवळच्या लोकांना घेऊन ते रुग्णालयात पोहोचले त्यावेळी मुलाचा मृतदेह पाहून ते अक्षरशः कोसळले. माझ्या मुलाची काय चूक होती, त्याला का मारले? फक्त डब्याचा दरवाजा लावला म्हणून त्याचा जीव घेतला. त्याला दोन थोबाडीत मारले असत्या, हातापायावर जखमा केल्या असत्या तरी चालले असते. आम्ही त्याला सांभाळले असते. त्याचा जीव का घेतला, असा टाहो रमेश लोहार यांनी फोडला. मयंकची आई या धक्क्यातून अद्यापही सावरलेली नाही. माझा मयंक परत येईल, असा तिचा आक्रोश सुरू होता. हे दृश्य पाहून सारेच जण हेलावून गेले. मयंक याचा भाऊ अहमदाबाद तर आजोबा दिल्लीत राहतात. ते आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती मयंकचे वडील रमेश लोहार यांनी दिली.

इतर प्रवाशांनाही दमदाटी

30 वर्षीय माथेफिरू हल्लेखोर रोशन सुवर्णाने इतर प्रवाशांनाही दमदाटी केली. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंकच्या मदतीला इतर प्रवासी पुढे आले नाहीत. रोशनच्या हातात धारदार चाकू असल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन होते. त्याने बोरिवली स्थानक येईपर्यंत ट्रेनमध्ये चाकूच्या साहाय्याने दहशत माजवली आणि लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच पळ काढला. रोशन हा अंधेरी येथेच कार्गोमध्ये बारकोडचे काम करीत होता.

दारूच्या नशेत होता

ज्या वेळी वादावादी झाली, त्या वेळी हल्लेखोर रोशन हा दारूच्या नशेत असल्याचे समजते. त्याच्याकडे तो चाकू आला कसा? प्रवासात त्याने चाकू का बाळगला होता? याचा अधिक तपास बोरिवली लोहमार्ग पोलीस करीत आहेत. लोकलमधील हत्याकांडाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यावर प्रवासी आणि नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या.

Comments are closed.