तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना

मराठी and Sanjay Dina Patil: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ईशान्य मुंबईतील ‘फुटीर’ खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली  आहे. संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत, त्यांनी “मी याआधी 5 लोकांना ठार केले आहे” असे विधान केले होते. यानंतर आता “संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आणि त्यांना कधी व का ठार केले?” असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि ‘युएपीए’ (UAPA) अंतर्गत अटक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

बेताल वक्तव्य खासदारांनी करू नयेत

दरम्यान, आता खासदार संजय दिना पाटील यांनी संजय राऊतांबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज आहेत. बेताल वक्तव्य खासदारांनी करू नये अशा सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्य आमदार खासदारांनी करू नयेत अशी सर्व नेत्यांना सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फुटलेले खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले

दरम्यान, पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, फुटलेले खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीरतेविरुद्ध महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप असून मतदार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, ईशान्य मुंबईतील खासदार संजय पाटील यांनी या आंदोलनकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. “माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन,” असे प्रक्षोभक वक्तव्य पाटील यांनी केल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

ते एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळाले आहेत?

खासदार संजय पाटील यांनी केवळ 5 जणांच्या हत्येची कबुलीच दिली नाही, तर “माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन,” अशीही धमकी दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका लोकप्रतिनिधीकडून बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले आहेत की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळाले आहेत? याची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची (ATS) मदत घेऊन त्यांच्या घराची झडती घेण्यात यावी आणि देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांच्यावर ‘युएपीए’ (UAPA) अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.