आज माझ्या भावाला ट्रेनमध्ये मारलं, उद्या …, मयांकचा भाऊ काय म्हणाला?

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादानंतर 21 वर्षीय मयंक लोहार याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे मयंकचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार प्रचंड धक्क्यात आहेत. मयंकच्या हत्येमुळे आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपीला एक तर फाशी द्या किंवा त्याचा एन्काऊंटर करा, अशी मागणी त्याचा भाऊ मेहूल लोहार याने केली आहे.

मृत मयंक लोहारचा भाऊ मेहुल लोहार प्रतिक्रिया देताना म्हणाला की, “मयंकच्या हत्येनंतर सगळे कुटुंबीय दुःखात बुडाले आहेत. माझ्या भावाला न्याय द्या. आरोपीला पकडण्यात आलं आहे. त्याला फाशी द्या किंवा त्याचा एन्काऊंटर करा. आज जे माझ्या भावासोबत घडलं ते इतर कुणासोबत होऊ नये, मुंबईमध्ये जे घडलं ते इतर ठिकाणी घडू नये. भावाला मरताना पाहणं हे अवघड असतं. महाराष्ट्र पोलिसांना विनंती आम्हाला न्याय द्या.”

मयंक लोहार याच्या आयुष्याची अजून सुरुवातही नीट झाली नसताना त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मुलाला न्याय मिळावा, यासाठी कुटुंबीयांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

मयंक हा अंधेरीच्या कपड्याच्या दुकानात सेल्स मॅनेजर पदावर होता. कुटुंबात तीन भाऊ आणि एक बहीण, आई, वडील असून ते विरारच्या सुराम पार्क येथील अमरनाथ बिल्डींगमध्ये राहतात. ते मूळचे उत्तराखंडचे आहेत.

Mumbai Local Train Crime : प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकलमध्ये उपस्थित काही प्रवाशांनी वेळेवर हस्तक्षेप केला असता किंवा तात्काळ मदत केली असती, तर मयंकचा जीव वाचू शकला असता, अशी भावना नातेवाईक आणि मित्र परिवारांकडून व्यक्त केली जात आहे.

या हत्याकांडामुळे मुंबई लोकलमधील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मृत मयंकला श्रद्धांजली अर्पण करताना परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सध्या मयंकचे आजोबा गावाहून यायचे आहेत, त्यामुळे मंयकचा मृतदेह बोरीवलीच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. आजोबा गावाहून आल्यावर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मृत मयंकच्या वडिलांनी दिली.

Mumbai Local Train Mayank Lohar Crime : नेमकं काय घडलं?

मुंबईतल्या लोकलमध्ये मयंक लोहार या तरुणाची क्षुल्लक कारणांवरुन चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी 11 वाजता जोगेश्वरी ते मालाड स्टेशनदरम्यान पावसाचं पाणी आत येत असल्यानं लोकलचा दरवाजा बंद करण्यावरुन त्याचा रोशन सुवर्णा याच्याशी वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की आरोपी रोशन सुवर्णा याने 22 वर्षीय मयंक लोहार या प्रवाशाची हत्या केली. मयंक हा विरारचा राहणारा आहे.

लोकल ट्रेनमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने त्याच्या बॅगमधून एक मोठा चाकू काढला आणि त्याने मयंकच्या कंबरेत आणि छातीत अनेक वार केले. यावेळी ट्रेनमध्ये गर्दी असतानाही त्याला वाचवायला कुणीही गेलं नाही. त्यानंतर आरोपी हा बोरिवली स्टेशनवर उतरला. एक हत्या करूनही आरोपी निवांतपणे चालत जात असल्याचं सीसीटीव्हीमधून दिसून आलं.

आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांनी सात तुकड्या रवाना केल्या होत्या. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा माग काढत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. मयांक लोहारच्या छातीत आणि कंबरेत अनेक वेळा चाकूचे वार झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी वाचा :

Comments are closed.