पहिल्या रांगेत बसण्यावरुन अपमान झाल्यानंतर मी निमूटपणे निघून आले; मेधा कुलकर्णींनी व्यक्त केली खदखद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरुन अभिमन्यू पवार यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रम मध्यातच सोडून निघून गेल्या. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त करत नेमकं काय घडलं याची माहिती दिली. चुकीचा उल्लेख केल्याने आपण दुखावलो गेलो आहोत असे त्यांनी सांगितलं. आपण याप्रकरणी कोणतीही तक्रार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी चांगल्या मनाने कार्यक्रमाला गेले होते. पहिल्या रांगेत काही रिकाम्या खुर्च्या होत्या. अधिकारी म्हणत होते की, जर खुर्च्या रिकाम्या असतील तर प्रोटोकॉलनुसार मेधा कुलकर्णी पुढे बसतील. तसेच माझ्याकडे कमिटीचं अध्यक्षपद आहे. मात्र, अभिमन्यू पवार यांना स्वत:ला तिथे बसायचं होतं म्हणून त्यांची धावाधाव सुरु होती. अधिकारी म्हणाले की, यानंतर मेधा कुलकर्णींचं नाव येतं. त्यावर ते म्हणाले की, हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तिथे बसल्यानंतर वाद होईल, असे दुखावणारे वक्तव्य त्यांनी केले.

हा कार्यक्रम मराठा समाजातील अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्यांचा, त्यांना शाबासकी देण्याचा आहे. पण कार्यक्रम शासनाचा आहे आणि प्रोटोकॉलनुसार त्यांची रचना केलेली असते. जात पाहून ती रचना केली जात नाही. मी कोणत्याही कार्यक्रमात लोकांना हिंदू म्हणून जगलं पाहिजे असं आवाहन करते. जातीचा विषय कुठे आला?, अशी विचारणा मेधा कुलकर्णी यांनी केली.

कार्यक्रम सुरु होण्याआधी फडणवीस आले तेव्हा एक समुदाय त्यांना भेटला. मी पण अशीच गंभीर केस घेऊन आले होते. मराठा बांधव होते. अभिमन्यू म्हणत होते हे नाही आत येणार, त्यांना बोलवू नका, आत पाठवू नका, मी पण एक जबाबदार पदाधिकारी आहे. स्थानिक प्रश्न घेऊन गेले आहे. अभिमन्यू पवार तुम्ही अजूनही स्वत:ला फडणवीसांचे ओएसडी समजता का? फडणवीस कोणाशी बोलणार हे तुम्ही ठरवणार का? कोणाला सोडायचं नाही हे तुम्ही ठरवणार का? आम्हीपण निष्ठावान कार्यकर्ते आहोत, असेही त्या म्हणाल्या. मी चांगल्या मनाने गेले होते, मी हा विषय शांतपणे घेतला आहे. मी त्यांना माफ करत आहे. मी तक्रार करणार नाही. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. जाती विसरुन देशाला पुढे घेऊन जाऊ. हे आव्हान स्विकारणार आहोत का? असा सवालही त्यांनी विचारला.

Comments are closed.