स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना पाचपट वीज बिल वाढीचा ‘शॉक’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्मार्ट मीटरचा गोंधळात गोंधळ सुरू झाल्यामुळे वीज बिलांची रक्कम तब्बल पाच ते दहा पटीने वाढल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ही वाढीव बिले कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात ग्राहकांची दररोज जत्रेसारखी गर्दी होत असली तरी त्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही. दरम्यान स्मार्ट मीटर बसवण्यासाठी वीज मंडळाने ग्राहकांवर सक्ती करू नये, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खालापूर शाखेने केली आहे.

स्मार्ट मीटरच्या विरोधात तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी खोपोलीतील वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी एकनाथ पिंगळे यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी संपर्कप्रमुख उमेश गावंड, जिल्हा परिषद सदस्या वैशाली खैर, रमेश पाटील, तालुका युवाधिकारी अंकुर बामणे, शहरप्रमुख संभाजी पाटील, नितीन पाटील, नीलेश जुनगरे, विलास चाळके, तुळशीराम पाटील, अनिल पिंगळे, चिंतामणी चव्हाण, गणेश पिंगळे, मंगेश पाटील, विष्णू खैर, मनोहर देशमुख, प्रवीण शिंदे, नंदकुमार मोरे, सागर पिंगळे, योगेश आगिवले, वसंत पाटील उपस्थित होते.

तीन हजारांचे बिल गेले १६ हजारांवर

नवी मुंबई-नेरुळ येथील सेक्टर १९ मधील सीवूड आर्केडमध्ये राहणाऱ्या अनेक रहिवाशांना स्मार्ट मीटरचा मोठा फटका बसला आहे. सोसायटीचे चेअरमन शिवाजी कांबळे यांना मे महिन्याचे वीज बिल ११ हजार ८७० तर जून महिन्याचे बिल १३ हजार १९० रुपये आले आहे. यापूर्वी त्यांचे बिल तीन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान होते. याच सोसायटीमधील रहिवासी प्रभाकर निर्मळे यांना मार्च महिन्यात तीन हजार रुपये बिल आले होते. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांचे बिल एप्रिलमध्ये दहा हजार, मे महिन्यात १५ हजार आणि जून महिन्यात तब्बल १६ हजार रुपये आले आहे.

Comments are closed.