INDW vs AUSW: लॉर्ड्सच्या मैदानात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी गाठ; खेळपट्टी ठरणार निर्णायक!

आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 women’s World Cup 2026) मध्ये भारतीय महिला संघाला आज, 28 जून रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना खेळायचा आहे. उपांत्य फेरीतील (सेमीफायनल) स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीत आहे. सध्या ग्रुप-ए च्या पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे 4 सामन्यांत 6 गुण आहेत, परंतु भारताचा रनरेट चांगला असल्याने भारत सध्या वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताला केवळ हा सामना जिंकणेच महत्त्वाचे नाही, तर रनरेटचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. हा सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता) सुरू होणार आहे. सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा होऊ शकतो, कारण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ (Slow) होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 150 च्या आसपास असते, तर दुसऱ्या डावात ती 130 पर्यंत खाली येते. भारतीय महिला संघ पहिल्यांदाच लॉर्ड्सवर टी20 सामना खेळणार आहे.

आजच लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात दुपारी 3 वाजता (भारतीय वेळेनुसार) सामना होणार आहे. हा सामना संपल्यानंतर भारतासमोर सेमीफायनलचे सर्व गणित स्पष्ट होईल. जर दक्षिण आफ्रिकेने फक्त सामना जिंकला आणि त्यांचा रनरेट भारतापेक्षा कमी राहिला, तर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त विजय मिळवणे पुरेसे असेल. मात्र, जर दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवून आपला रनरेट भारताच्या पुढे नेला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला विजयासोबतच रनरेटचीही मोठी कसरत करावी लागेल.

Comments are closed.