मुंबई इंडियन्सकडून 5 खेळाडूंना रिलीज करण्याची तयारी! यादीत कर्णधार हार्दिकचंही नाव

आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. 14 सामन्यांपैकी त्यांना केवळ 4 सामने जिंकता आले आणि गुणतालिकेत (Points Table) हा संघ 9 व्या क्रमांकावर फेकला गेला. केवळ या हंगामातच नाही, तर गेल्या तीन वर्षांपासून मुंबईची कामगिरी सातत्याने खालावलेली आहे.

2024 च्या हंगामात हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती, मात्र गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणारा हा खेळाडू मुंबईसाठी काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आता मुंबई इंडियन्स आगामी हंगामासाठी कर्णधार हार्दिक पांड्यासह एकूण 5 खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या नियमांनुसार, लिलावाच्या एक महिना आधी सर्व 10 संघांना रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करावी लागते. यंदा ही यादी 15 नोव्हेंबरपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याच्या ‘ट्रेड’ (दुसऱ्या संघात जाण्याबाबत) चर्चा सध्या जोर धरत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स या अष्टपैलू खेळाडूला संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. हार्दिक ज्या संघात जाईल, तिथे तो कर्णधार म्हणूनच खेळेल, हे जवळपास निश्चित आहे.

या 5 खेळाडूंना मुंबई इंडियन्स करू शकते रिलीज!

हार्दिक पांड्या: मुंबईत परतल्यापासून हार्दिकच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघालेले नाही. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या नावावर आयपीएलमध्ये एकही फिफ्टी नाही. कर्णधार म्हणूनही तो अपयशी ठरला असून, गोलंदाजी आणि फलंदाजीतील त्याची कामगिरीही सरासरीच राहिली आहे. जर ट्रेड डीलद्वारे तो दुसऱ्या संघात गेला नाही, तर फ्रेंचायझी त्याला लिलावापूर्वी रिलीज करू शकते.

शेरफेन रदरफोर्ड: वेस्ट इंडिजच्या या स्फोटक फलंदाजाला ‘मॅच फिनिशर’ म्हणून टीममध्ये घेतले होते, पण तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

ट्रेंट बोल्ट: न्यूझीलंडचा हा अनुभवी वेगवान गोलंदाज आयपीएल 2026 मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला. त्याच्या गोलंदाजीत पूर्वीची धार राहिलेली नाही. बोल्ट आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या कामगिरीवर होताना दिसत आहे.

क्विंटन डी कॉक: दक्षिण आफ्रिकेच्या या यष्टीरक्षक फलंदाजाला 2026 च्या हंगामात फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत. संघात आधीच सलामीवीर (Openers) उपलब्ध असल्याने, डी कॉकच्या जागी मधल्या फळीत एखादा आक्रमक फलंदाज आणण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते.

केशव महाराज: दक्षिण आफ्रिकेच्या या फिरकी गोलंदाजाला मुंबईने बदली खेळाडू (Replacement) म्हणून घेतले होते. 2026 मध्ये त्याने एकही सामना खेळलेला नाही, पण संघात स्थान मिळत नसल्यामुळे त्यालाही रिलीज केले जाऊ शकते.

Comments are closed.