कल्याणमध्ये दोन पीडित तरुणींची सुटका, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला वकिलाला अटक
सेक्स रॅकेट चालवणारी कल्याणमधील महिला वकील मनीषा नांदे हिच्या ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील एका नामांकित हॉटेलवर छापा मारून वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. या सेक्स रॅकेटच्या मागे मनीषा नांदे असल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तिने आणखी किती मुलींना आपल्या जाळ्यात ओढले आहे, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
मनीषा नांदे ही कल्याण आणि पनवेल येथील न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करीत होती. कल्याण पूर्वेतील एका नामांकित हॉटेलमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कथित सेक्स रॅकेटचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी दोन तरुणी आढळून आल्या. त्यांना जबरदस्तीने मनीषाने वेश्या व्यवसायात ढकलले होते. या सेक्स रॅकेटमध्ये हॉटेल चालकाचा सहभाग आहे का, तसेच आणखी किती तरुणींना या रॅकेटमध्ये ओढण्यात आले आहे, याचा तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.
– मनीषाव्यतिरिक्त या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहार कसे होत होते आणि यामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
– पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत धंदे सुरू असलेल्या लॉज आणि हॉटेल चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे धाडसत्र यापुढेही असे सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Comments are closed.