“मी 13 षटकार मारणार”, वैभव सूर्यवंशीने मॅचआधीच सांगितलं होतं; पुढे जे झालं ते पाहून जग बघतच राहिलं!

वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी जगाला आपले वेड लावले आहे. मोठे-मोठे दिग्गज खेळाडू त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत. वैभव आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या हंगामात ७२ षटकार ठोकून येत आहे, जो स्वतःमध्येच एक विक्रम आहे. २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) कुमार संगकारा यांनी एक मोठा खुलासा केला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एका मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यापूर्वी, वैभव सूर्यवंशीने स्वतः एकट्याने १३ षटकार मारणार असल्याचे कसे सांगितले होते, हे संगकारा यांनी स्पष्ट केले.

​खरं तर, आयपीएल २०२६ मधील एका सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) राजस्थान रॉयल्ससमोर २२१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. ‘स्काय स्पोर्ट्स’शी बोलताना कुमार संगकारा यांनी सांगितले की, वैभवने त्यांच्याकडे येऊन तो १३ षटकार मारणार असल्याचे कसे सांगितले होते. वैभवचे हे बोलणे ऐकून डोनोवन फरेरा आणि लुआन ड्री प्रिटोरियस देखील चक्रावून गेले होते.

​कुमार संगकारा यांनी सांगितले, “आम्ही लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळत होतो, आम्हाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी २२१ धावांचा पाठलाग करायचा होता. वैभवने डोळा मारला आणि माझ्या जवळ येऊन म्हणाला, ‘कोच काळजी करू नका, आपण जिंकलो असंच समजा.’ यानंतर वैभवने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन डोनोवन फरेरा आणि लुआन ड्री प्रिटोरियस यांना सांगितले, ‘मी आज १३ षटकार मारणार आहे. मी हे केल्यानंतर उर्वरित मॅच तुम्ही दोघे सांभाळून घ्या.’”

​कुमार संगकारा यांनी पुढे सांगितले, “वैभवने त्यानंतर सामन्यात १० षटकार मारले. जेव्हा त्याने ५ षटकार मारले होते, तेव्हा डोनोवन आणि प्रिटोरियस यांनी एकमेकांकडे पाहिले आणि विचार केला की, हा मुलगा नक्की काय बोलत होता? त्यानंतर ते दोघे खाली बसले आणि म्हणाले, ‘आता आपण याच्या षटकारांची मोजणी करायला हवी, कारण हा मुलगा जे बोलला ते खरंच करून दाखवणार आहे.’ वैभवचा आत्मविश्वास या पातळीवर आहे.”

​विशेष म्हणजे, वैभवने त्या सामन्यात ३८ चेंडूत ९३ धावा केल्या आणि १० षटकार ठोकले. राजस्थानने तो सामना ५ चेंडू राखून ७ गडी राखून जिंकला.

Comments are closed.