बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

संघातर्फे जारी करण्यात आलेला मिडनाईट कर्फ्यू तोडणे आणि नाईटक्लबमध्ये उपस्थित राहिल्यामुळे वादात अडकलेल्या बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत खेळत आहेत. शेवटचे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले तर ही कसोटी आपण जिंकू शकतो. मीही तेच करणार आहे, तुम्हीही तेच कराल अशी आशा आहे असं स्टोक्सने चौथ्या दिवसापूर्वी सहकाऱ्यांशी बोलताना सांगितलं. निवृत्ती का घेतोय याची कारणं आहेत. पण ती आता सांगणार नाही, नंतर कधीतरी असंही स्टोक्सने सांगितलं.

पहिली कसोटी जिंकल्यानंतर स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन संघातर्फे जारी करण्यात आलेला मिडनाईट कर्फ्यू तोडून नाईटक्लबमध्ये गेले होते. तिथे एका रग्बी खेळाडूशी त्यांची बाचाबाची झाली. यानंतर इंग्लंड संघाच्या सेक्युरिटी स्टाफने दोघांना तिथून बाजूला केलं. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्स-अॅटकिन्सन दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीत हे स्पष्ट केलं. दुसरी कसोटी न्यूझीलंडने जिंकली. या दरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रकरणाची चौकशी केली. स्टोक्स आणि अॅटकिन्सन दोषी नसल्याचं स्पष्ट झालं. यामुळे या दोघांचा तिसऱ्या कसोटीसाठी समावेश करण्यात आला.

स्टोक्स आणि वाद हे नवीन नाहीत. याआधीही स्टोक्स नाईटक्लब प्रकरणात सापडला होता. शनिवारी स्टोक्सने दुर्मीळ विक्रम नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये ७००० धावा आणि २५० विकेट्स अशी कामगिरी नावावर करणारा स्टोक्स केवळ दुसरा खेळाडू ठरला. स्टोक्सने १२१ कसोटी, ११४ वनडे आणि ४३ टी२० सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. २०१९ वनडे वर्ल्डकप आणि २०२२ टी२० वर्ल्डकपविजेत्या इंग्लंड संघाचा तो अविभाज्य घटक होता.

Comments are closed.