IND vs AUS: स्मृती-शेफालीची ऐतिहासिक कामगिरी! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावांची नोंद

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 (Icc T20 women’s World Cup 2026) मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात एक महत्त्वाचा सामना सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 खेळाडूंच्या मोबदल्यात 170 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana & Shefali verma) आणि शफाली वर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली.

या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या कामगिरीसह, या भारतीय सलामीच्या जोडीने एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला आहे. महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध एका विशिष्ट जोडीने बनवलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आता स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या नावावर झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत मानधना आणि शेफाली या जोडीचा विक्रम अत्यंत प्रभावी राहिला आहे. त्यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 डावांत एकत्र फलंदाजी केली आहे. यात 32.16 च्या सरासरीने त्यांनी एकूण 772 धावा केल्या असून, यामध्ये एका शतकीय आणि चार अर्धशतकीय भागीदारींचा समावेश आहे. या विक्रमासह त्यांनी न्यूझीलंडच्या सूजी बेट्स आणि सोफी डिवाइन या जोडीला मागे टाकले आहे, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळून 732 धावा केल्या होत्या.

महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या!

स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा (भारत): 772 धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

सूजी बेट्स आणि सोफी डिवाइन (न्यूझीलंड): 732 धावा (विरुद्ध दक्षिण आफ्रिका)

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (भारत): 655 धावा (विरुद्ध इंग्लंड)

एलिसा हिली आणि बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया): 535 धावा (विरुद्ध भारत)

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (भारत): 522 धावा (विरुद्ध श्रीलंका)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी20 विश्वचषक सामन्यात मानधना आणि शेफाली यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यांना अर्धशतक पूर्ण करता आले नाही. शफालीने 26 चेंडूंत 34 धावा केल्या, तर स्मृती मानधनाने 37 चेंडूंत 38 धावांची खेळी केली.

Comments are closed.