अलका याज्ञिक यांना झालेला SNHL आजार नेमका काय, जाणून घ्या
भारतीय चित्रपटसृष्टीतील असंख्य सुपरहिट गाण्यांना आपल्या आवाजाची जादू लाभलेल्या गायिका अलका याज्ञिक यांना नुकतेच पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा क्षण त्यांच्या चाहत्यांसाठी अभिमानाचा होता. मात्र, पुरस्कार सोहळ्यानंतर व्हीलचेअरवर दिसलेल्या त्यांच्या व्हिडीओने चाहत्यांच्या मनात चिंता निर्माण केली. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल प्रश्न उपस्थित केले. अखेर अलका याज्ञिक यांनी स्वतःच या चर्चांना पूर्णविराम देत आपल्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती दिली.
“काळजी करू नका… “
व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अलका याज्ञिक यांनी चाहत्यांचे प्रेम, शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी मनापासून आभार मानले. त्यांनी सांगितले की, पद्म पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांना थोडासा थकवा जाणवत होता. त्यामुळे चालण्याचा ताण टाळण्यासाठी त्यांनी व्हीलचेअरचा वापर केला. मात्र, याचा अर्थ त्यांची प्रकृती गंभीर असल्याचा नाही. सध्या तब्येत सुधारत असून त्या हळूहळू पूर्ववत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पद्मभूषणाचा अभिमान
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारताना अलका याज्ञिक भावूक झाल्या होत्या. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारत सरकारचे त्यांनी आभार मानले. मात्र, या आनंदाच्या क्षणातही त्यांना सहाय्यकाच्या मदतीने मंचावर जावे लागल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाली.
नेमका आजार कोणता?
अलका याज्ञिक या काही काळापासून ‘सेन्सोरिन्युरल नर्व्ह हिअरिंग लॉस’ (SNHL) या दुर्मिळ श्रवणदोषाशी सामना करत आहेत. या आजारामध्ये कानाच्या आतील संवेदनशील पेशी किंवा मेंदूपर्यंत आवाज पोहोचवणाऱ्या मज्जातंतूंना इजा झाल्याने ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. काही रुग्णांमध्ये हा त्रास अचानक जाणवतो, तर काहींमध्ये तो हळूहळू वाढत जातो.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
गोंगाटाच्या ठिकाणी बोलणे समजण्यात अडचण येणे, काही विशिष्ट अक्षरांचे आवाज स्पष्ट न ऐकू येणे, एका कानात आवाज अधिक मोठा किंवा वेगळा जाणवणे, दोन-तीन जण एकाच वेळी बोलत असतील तर संभाषण समजण्यास त्रास होणे अशी लक्षणे या आजारामध्ये दिसू शकतात. अशी लक्षणे जाणवल्यास वेळ न दवडता कान-नाक-घसा तज्ज्ञ किंवा ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
चाहत्यांच्या प्रेमाने मिळतेय ताकद
अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या प्रेमामुळे आणि प्रार्थनांमुळे मानसिक बळ मिळत असल्याचे सांगितले. त्यांच्या या सकारात्मक मेसेजमुळे चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.