देश-विदेश : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 स्कायडायव्हर्सचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फ्रान्समधील नॅन्सी शहराजवळ टॉम्बलेन येथे एका प्रवासी विमानाला अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 स्कायडायव्हर्स आणि एका वैमानिकाचा (पायलटचा) समावेश आहे.

स्कायडायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाच प्रशिक्षकांसह पाच विद्यार्थ्यांच्या गटाने या विमानातून उड्डाण केले होते. स्कायडायव्हिंगचा थरार पाहण्यासाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्यांच्यासमोरच सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे विमान कोसळले. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आरामको’चे हेलिकॉप्टर कोसळले; 14 जणांचा मृत्यू

रियाध : सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी ‘आरामको’चे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सौदीतील रास तानुरा येथे रविवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नसून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

अपघातात मरण पावलेले सर्व नागरिक सौदी अरेबियाचे होते. सौदी सरकारने या अपघाताला दुजोरा दिला आहे. अमेरिका-इराण युद्धामध्ये रास तानुरा येथील ‘आरामको’ची महाकाय रिफायनरी इराणी लष्कराचे लक्ष्य ठरली होती. हल्ल्यामुळे तेथील सर्व कामकाज बंद होते. शुक्रवारपासून तिथे पुन्हा तेल भरणे सुरू झाले आहे. अशातच हा अपघात झाला आहे.

रशियासाठी कठीण काळ : पुतीन

मॉस्को : ‘रशिया सध्या कठीण काळातून जात आहे. मात्र, या खडतर परिस्थितीने आपल्याला खूप काही शिकवले आहे. सर्व आव्हानांवर मात करून देशाची सुरक्षितता अबाधित राखू,’ असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज व्यक्त केला.

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ‘युनायटेड रशिया पार्टी’च्या मेळाव्यात ते बोलत होते. पश्चिमेकडील राष्ट्रांनी लादलेले आर्थिक निर्बंध आणि युक्रेन युद्ध अशा दोन आघाड्यांवर सध्या रशिया लढत आहे. या आव्हानांचा सामना करताना रशियाची दमछाक होत असल्याची कबुली पुतीन यांनी दिली. वेगवेगळ्या संकटांमुळे देश अधिक मजबूत झाला आहे, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत ‘युनायटेड रशिया पार्टी’ला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments are closed.