कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मोठी लष्करी कारवाई; महिला-मुलांसह 35 नागरिक ठार झाल्याचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कराचीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने रविवारी मध्यरात्री अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने हे हल्ले तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि जमात-उल-अहरारच्या तळांवर केल्याचे म्हटले असले, तरी अफगाणिस्तानकडून या कारवाईत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अफगाण माध्यमे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पक्तिका आणि कुनार प्रांतातील निवासी भागांवर झालेल्या हल्ल्यांत किमान 35 नागरिकांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हल्ले हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता पक्तिका प्रांतातील ज्ञान आणि चमकानी परिसर तसेच कुनार प्रांतातील मारवारा येथे झाल्याचे सांगितले जाते. पहिल्या हल्ल्यानंतर मदतीसाठी धावलेल्या नागरिकांवर काही मिनिटांनी पुन्हा हवाई हल्ला झाल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने या कारवाईत सुमारे 25 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्ला तारार यांनी ही कारवाई दहशतवादी तळांवरच केंद्रित असल्याचे म्हटले आहे. एबीपी न्यूज ने हे वृत्त दिले आहे.

स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी मात्र या दाव्याला विरोध केला आहे. हल्ल्यावेळी परिसरात कोणतेही दहशतवादी किंवा सुरक्षा दलाचे सदस्य नसून सर्वसामान्य नागरिकच असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दहशतवादाच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यांपासून तणाव कायम आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचा दावा केला जात असताना, अफगाणिस्तानकडून मात्र या हल्ल्यांत नागरिकांना लक्ष्य केल्याचे आरोप सातत्याने करण्यात येत आहेत. या घटनेबाबत दोन्ही देशांच्या दाव्यांची स्वतंत्र आंतरराष्ट्रीय पडताळणी मात्र अद्याप झालेली नाही.

Comments are closed.