अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात पुर्णगड,बारसू आणि देवगडची वज्रमूठ, कोकण अणुउर्जा प्रकल्प विरोधी संघाची स्थापना
कोकणावर आलेल्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात पुर्णगड,बारसू आणि देवगड परिसरातील ग्रामस्थ एकवटले आहेत. अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात कोकणात एक वज्रमूठ बांधली गेली आहे. पुर्णगड,बारसू आणि देवगड येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात कोकण अणुउर्जा प्रकल्प विरोधी संघाची स्थापना करत आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
राजापूर येथे शाश्वत कोकण परिषदेची सभा पार पडली. राजापूर, बारसु, पन्हळे धोपेश्वर, नाणार, देवगड, मुणगे, हिंदळे, मिठगवाणे, पूर्णगड, उपळे, सोलगाव, गोवळ, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे, साखरी नाटे, होळी, जैतापूर, गावखडी, कुंभवडे, आडिवरे, देवीहसोळ, नारीग्रे, बागमळा, जुवे गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमार, बागायतदार आणि मुंबईत राहणारे चाकरमानी एकत्र जमले. या सभेला पर्यावरणाचे अभ्यासक सौम्या दत्ता,डॉ.मंगेश सावंत,सत्यजित चव्हाण आणि रानमाणूस प्रसाद गावडे उपस्थित होते.सर्वांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
सर्वांच्या सहमतीने ‘कोकण अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघ ‘ स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला. पुर्णगड,बारसू आणि देवगड या तीनही ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ एकवटू लागले आहेत. यापूर्वी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन झाले होते.त्यानंतर पुन्हा एकदा कोकणात संघर्ष पेटणार आहे.कोकण अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघ स्थापन झाल्यानंतर आता आंदोलनाची ठिणगी पडली आहे.
Comments are closed.