खोटारड्या भाजप सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केलाच पाहिजे – हर्षवर्धन सपकाळ
भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार अत्यंत खोटारडे आहे. भाजप संसदेत खोटे बोलतो, राम मंदिरात खोटे बोलतो, तसाच शेतकऱ्यांशीही खोटे बोलतो. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची घोषणा भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण सत्तेत येताच त्यांनी फसवी कर्जमाफी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनी एल्गार पुकारला असून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करेपर्यंत हा एल्गार थांबणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या न्याय्य मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सहभाग घेतला, यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, मा. आ. सुनील भुसारा यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, शेतमालाला भाव नाही, महागाई प्रचंड वाढली आहे. शेती करणे परवडणारे नाही, शेती व शेतकरी दोन्ही संकटात आहे पण भाजप सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. लाडक्या बहिणींची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक व विश्वासघात भाजप सरकारने अन्नदात्याचाही केला आहे. सात बारा कोरा करण्याची वल्गना केली होती पण जाहीर केलेली कर्जमाफी मात्र फसवी आहे, लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मागील दोन महिन्यांपासून काँग्रेस व मित्रपक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत पण सरकार काही जागे होत नाही. सरकारला जाग येईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असेही सपकाळ म्हणाले..
टीईटी पेपर फुटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ही काही पहिलीच पेपरफुटी झालेली नाही. भाजप सरकारच्या काळात आत्तापर्यंत 77 वेळा पेपरफुटी झालेली आहे. पेपरफुटी हा धंदा बनला असून व्यापमपेक्षाही हा मोठा घोटाळा आहे. सरकार नावाची यंत्रणा व व्यवस्था कुठेच दिसत नाही. विद्यार्थी व पालकांची क्रूर थट्टा सुरु असून तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरु आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठे आंदोलन हाती घेतलेले आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले
Comments are closed.