विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं,

Nagpur Crime News नागपूर: नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच शहरात हत्येची धक्कादायक घटना (Nagpur Crime News) घडल्याने खळबळ उडाली आहे. काल दुपारी विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर हत्येची घटना घडल्याने नागपूर शहर हादरले आहे.

नेमकं काय घडलं? (Nagpur Crime News)

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलाव परिसरात सायंकाळच्या सुमारास एका युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, कुख्यात गुन्हेगार शेखुचा भाचा अस्तक खान याच्यावर लाला पांडे या संशयिताने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अस्तक खानचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार- (Nagpur Crime News)

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विविध विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

नागपूरमधील आणखी एक धक्कादायक घटना- (Nagpur Crime News)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील हायटेक पोलीस आणि त्यांची हजारो कॅमेऱ्यांची यंत्रणा गेल्या तीन आठवड्यांपासून एका निळ्या रंगाच्या कारला शोधू शकलेली नाही. त्यामुळे एक वृद्ध त्याच्या मृत्यूनंतरही न्यायाला मुकला आहे. नागपूरच्या महाल परिसरात 7 जूनच्या पहाटे साडे पाचवाजाच्या सुमारास एका निळ्या रंगाच्या कारने अनियंत्रित होऊन मुकुंद बाभरे या 72 वर्षीय वृद्धाला जोरदार धडक दिली होती. नित्यनेमाप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघालेले मुकुंद बाभरे त्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. पाच दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 12 जून रोजी मुकुंद बाभरे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताच्या त्या घटनेला आज तीन आठवडे उलटले, तरी आरोपीला शिक्षा देणे तर सोडूनच द्या, नागपूर पोलिस त्या कारचा शोध ही घेऊ शकलेले नाही. ती कार कोण चालवत होता? ती कुठून येत होती कुठे जात होती?? पहाटे साडे पाच वाजता रिकाम्या रस्त्यावर ती कार अनियंत्रित का झाली?? कारचालक मद्यधुंद होता की अमली पदार्थांचा सेवन करून होता, कुठल्याही प्रश्नाचा उत्तर नागपूर पोलीस शोधू शकलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हे अपघात झाले, त्याच्या अगदी जवळ बडकस चौक असून बडकस चौकापासून हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे महापालिकेने बडकस चौकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. मात्र ज्याअर्थी तीन आठवड्यानंतर ही पोलीस मुकुंद बाभरे यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या कार आणि कारचालकाचा शोध लावू शकलेले नाही, ते पाहता बडकस चौक सारख्या संवेदनशील ठिकाणावरचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातमी:

माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण

Comments are closed.