वरळीची शिवसेना दत्ता नलावडेंनी बांधलीय, सचिन अहिरच्या जाण्याने कसला धक्कातंत्र?

मुंबई : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात अतिशय नाट्यमयरित्या ही घटना घडली असून त्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असून भविष्यात वरळीतून त्यांच्यासमोर सचिन अहिर यांच्या रुपाने आव्हान उभे राहू शकतं अशीदेखील चर्चा सुरू आहे.

या सर्व घडामोडींवर मात्र ठाकरेंच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्याचं दिसतंय. जुने शिवसैनिक आणि ठाकरेच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांनी यावेळी सचिन अहिर यांच्यावर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं.

सचिन अहिर जाण्याने कसला आला धक्कातंत्रं? असा रोखठोक प्रश्न सुनील प्रभु यांनी विचारला. वरळी हा आमचा आधीही बालेकिल्ला होता. दत्ता नलवडे  (Datta Nalawade) आमचे नेते होते, त्यांनी वरळीतील शिवसेना बांधली आहे, असं सुनील प्रभु म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेत एवढी पदं मिळाली असताना सचिन अहिर का सोडून गेले, हे त्यांनाच विचारा असं सुनील प्रभु म्हणाले.

Sunil Prabhu On Shivsena : आमदार उद्धव साहेबांसोबतच

आधी सहा खासदार फोडले, त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनाही शिंदेंच्या शिवसेनेने फोडलं. त्यानंतर आता ठाकरेंचे अनेक आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या अनेक नेत्यांनी केला. त्यावरही सुनील प्रभुंनी प्रतिक्रिया दिली. आमदार जाणार ही बातमी कुठून आली? मी अनेकांशी बोलत आहे, आम्ही सगळेजण उद्धव साहेबांसोबतच आहोत, असं सुनील प्रभु म्हणाले.

Sunil Shinde On Sachin Ahir : सुनील शिंदेंची टीका

दरम्यान, सचिन अहिरांवर प्रतिक्रिया देताना ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे म्हणाले की, “मतांची अॅडजेस्टमेंट करायला हे आमच्यात आले होते. आमच्या पक्षात येऊन स्वतःची ताकद वाढवली, आणि आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली. शरद पवारांशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत, तर मग आमच्यासोबत कसे राहतील? सचिन अहिर काय करतात हे मला माहिती होतं. पण मी एक लहान कार्यकर्ता असल्याने बोलू शकलो नाही.”

वरळीपुरतं बोलायचं झालं तर आमच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं सुनील शिंदे म्हणाले.

ही बातमी वाचा:

Comments are closed.