आमदार निवासाची दुरवस्था; तिसऱ्या मजल्यावरील छताचं प्लास्टर कोसळलं, सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबईतील आमदार निवासाच्या इमारतीची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विस्तारित आमदार निवासाच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचे प्लास्टर अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही दुखापत झालेली नाही. याआधीही अनेकदा आमदार निवास इमारतीमधील दुरवस्थेचे प्रकार समोर आले होते, मात्र या ताज्या घटनेमुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा उघड झाला आहे.
शनिवार असल्याने विधानभवनाचे कामकाज बंद होते. त्यामुळे बहुतांश आमदार, त्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते आपापल्या घरी गेले होते. घटना घडली त्याठिकाणी त्यावेळी कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यभरातून आलेले अनेक आमदार आणि त्यांचे प्रतिनिधी दक्षिण मुंबईतील या विस्तारित आमदार निवासात वास्तव्यास असतात. जर सुट्टीचा दिवस नसता आणि तिथे नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ असती, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
यावरच महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत X अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात टीका करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमदार निवासाच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचे प्लास्टर कोसळल्याची ही घटना प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे जिवंत उदाहरण आहे. सुदैवाने आज अधिवेशनाला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला; पण कोट्यवधींचा निधी खर्च करूनही लोकप्रतिनिधींच्याच निवासाची ही दुरवस्था असेल, तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? देखभालीच्या नावाखाली होणाऱ्या खर्चाची आणि या निकृष्ट कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे.”
Comments are closed.