पेरणीसाठी संपूर्ण कुटुंबच जुंपले कुळवाला, आदिवासी बांधवांचा संघर्ष; अकोले तालुक्यातील विदारक वास्तव
एकीकडे आधुनिक शेती, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचा सर्वत्र गाजावाजा केला जातो. मात्र, दुसरीकडे अकोले तालुक्यातील आदिवासी भागात आजही काही कुटुंबे स्वतःच्या अंगमेहनतीवर शेती कसत आहेत. राजूर परिसरातील जामगाव येथील आदिवासी शेतकरी भागवत उघडे यांनी बैलजोडी किंवा ट्रॅक्टरची सोय नसल्याने स्वतःच्या कुटुंबालाच पाभार आणि कुळवाला जुंपून अनवानी पायाने भुईमूग आणि सोयाबीनची पेरणी करण्याची वेळ आली. पत्नी, भाऊ, भावजय, मुलगा आणि नातेवाईक यांच्या मदतीने पेरणी पूर्ण करताना दिसलेले हे दृश्य महायुती सरकारच्या ग्रामीण विकासाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे.
अडीच एकर कोरडवाहू जमिनीवर शेती करणारे भागवत उघडे यांच्याकडे बैलजोडी खरेदी करण्याची आर्थिक ताकद नाही, तर ट्रॅक्टरचे वाढते भाडेही परवडत नसल्याने त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच उरत नाही. उघडे म्हणाले की, अनेक वर्षांपासून आम्ही अशाच पद्धतीने शेती करतो. पाऊस सुरू होण्यापूर्वी पेरणी झाली नाही तर संपूर्ण वर्षाचे नुकसान होते. म्हणून कुटुंबालाच पाभार, कुळवाला जुंपून शेती करावी लागते. आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे ज्वलंत वास्तव, व्यथा मांडताना भागवत उघडे यांचे डोळे भरून आले होते.
उघडे यांच्या कुटुंबात एकूण आठ सदस्य आहेत. आई, वडील हयात नसल्याने दोन्ही भाऊ मिळून शेतीची जबाबदारी सांभाळतात. शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने उर्वरित काळात संपूर्ण कुटुंब रोजंदारी व मजुरी करून उदरनिर्वाह करतात. पावसावरच पूर्णपणे अवलंबून असलेल्या या शेतीत सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्याने उन्हाळ्यात उत्पन्नाचा स्रोतच राहत नाही. भुईमूग आणि सोयाबीन ही पिके घेणाऱ्या या कुटुंबाला शेतीसाठी मूलभूत सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे.
Comments are closed.