महाराष्ट्र सेवा संघातर्फे ‘गिरिमित्र संमेलन’, लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी मार्गदर्शन करणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र सेवा संघातर्फे २३ व्या गिरिमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनात सियाचीन हिमनदीवरील भारतीय लष्कराच्या वीरांचा युद्धभूमीवरील गिर्यारोहणाचा रोमांच अनुभवता येणार असून, त्यात ‘ऑपरेशन मेघदूत’ आणि ‘ऑपरेशन राजीव’ या दोन महत्त्वपूर्ण मोहिमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ११ आणि १२ जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे हे संमेलन पार पडणार आहे.

११ जुलै रोजी छायाचित्रे, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी तयार केलेल्या माहितीपटांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, अतिउंचीवरील सीमाभागात गिर्यारोहण कौशल्यांचा कसा उपयोग होतो याविषयी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत.

१२ जुलै रोजी लेफ्टनंट जनरल रमेश कुलकर्णी आणि लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी हे सियाचीनमधील ‘ऑपरेशन मेघदूत’ आणि ‘ऑपरेशन राजीव’ या मोहिमांवरील अनुभव मांडणार आहेत. तर नायब सुभेदार बाना सिंग हे ‘ऑपरेशन राजीव’मधील त्यांच्या अनुभवांचे कथन करणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी भूषवणार असून संमेलनाचे प्रमुख अनिल भंडारी, लेफ्टनंट जनरल रमेश कुलकर्णी, लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, नायब सुभेदार बाना सिंग, भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख के. एस. होसाळीकर आणि ज्येष्ठ गिर्यारोहक रमाकांत महाडिक हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘रील्स स्पर्धा’, ‘जेन-झी-ट्रेकिंग’

या वर्षी छायाचित्रण आणि ब्लॉग स्पर्धांसोबतच ‘रील्स स्पर्धा’ आणि ’जेन-झी-ट्रेकिंग’ हे नवे उपक्रम राबवले जाणार आहेत. या माध्यमातून तरुण पिढीला ट्रेकिंग मोहिमांचे नियोजन, आयोजन आणि सहभागाचे अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी आयोजित प्रदर्शनासाठी नागरिकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे.

संपर्क: श्रीकर पिसोळकर ९८६९७९०१४६, अमेया बोले ९८६९४५८४६२.

Comments are closed.