ह्रदयद्रावक.. सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून खदानीत सेल्फी काढताना पाय घसरून पडलेल्या तरुणाला वाचवताना आणखी दोघांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चोप्रा (जळगाव) रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या खोल पाण्यात (Drowned) बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी पावणेपाच वाजाताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेनं संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मानव बंटी रतनानी (वय 14), कार्तिक विकी उधवानी (वय 14) आणि दिनेश विजय पंजवानी (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. तिन्ही मुले अमळनेरच्या सिंधी कॉलनीमधील रहिवासी होती.

प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मुले मंगळवारी सायंकाळी सुमारे 4.46  वाजता खदाणीत  गेली होती. खदाणीत एक बेटासारखा उंचवटा असल्याने तिघे पाण्यातून चालत त्याच्यावर चढले. इकडच्या बाजूला एक फूट पाणी होते.  सेल्फी काढतांना एकाचा पाय घसरला त्याला वाचवायला दुसर्याने त्याचा हात धरला मात्र तोही खाली जाऊ लागला म्हणून त्याने तिसऱ्याचा  हात धरला मात्र तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. ही घटना एका रिक्षावाल्याच्या नजरेस पडली. तो धावत खाली खदाणीजवळ पोहचला तोपर्यंत एकाने ११२ डायल केले.  घटनेची माहिती मिळताच देवळी येथील व  स्थानिक नागरिक आणि पोलिस  निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी यु पाटील ,  शहर तलाठी  अशपाक पिंजारी , पोलीस  गणेश पाटील ,घटनास्थळी पोहचले. मोठ्या प्रयत्नांनंतर  देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.  तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक निकम ,हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील , कॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी पंचनामा केला.

दिनेश हा प्रताप कॉलेजला 11 वी कॉमर्स ला शिकत होता ते दारू दुकानावर कामगार होते , तर मानव हा पिबीए इंग्लिश मिडियम स्कूलला 9 वीमध्ये शिकत होता, त्याचे वडील हॉटेल कामगार आहेत. तर, कार्तिक देखील पीबीए स्कूलला 9 वी मध्ये शिकत होता, त्याचे वडील बेकरीत काम करतात. एकाचवेळी 3 निरागस मुलांचा मृत्यू झाल्याने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले. शहरभर या दुर्दैवी घटनेला शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नाले,तलाव, खदान भरलेले असतात पाण्याचे अंदाज येत नाही. त्यामुळे लहान मुलांनी आणि पोहता न येणाऱ्या नागरिकांनी अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

हेही वाचा

धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ

Comments are closed.