बनवस येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अखेर ‘त्या’ बोगस डॉक्टर विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालम तालुक्यातील बनवस येथील 25 वर्षीय गणेश ज्ञानोबा राजले याच्या मृत्यूप्रकरणी अखेर गावातील कथित डॉक्टराविरोधात पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यक पदवी नसताना सलाईन व इंजेक्शन देऊन तरुणाचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत ज्ञानोबा मुंजाजी राजले (वय 46, रा. बनवस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. बापुसाहेब प्रसादआप्पा लांडगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 105 अन्वये पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, 21 जून 2026 रोजी सकाळी गणेश राजले याचा हात दुखत असल्याने त्याला उपचारासाठी डॉ. लांडगे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. आरोपीकडे वैद्यकीय उपचार करण्याची पदवी नसतानाही त्यांनी गणेशला सलाईन व इंजेक्शन दिले. त्या उपचारांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चिट्टेवार करीत आहेत. फिर्याद 8 जुलै रोजी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून त्याला अटक करणे बाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बनवस येथील या घटनेनंतर ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments are closed.