इंग्लंडकडून मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, 'चुका होणारच, पण…'

आयर्लंडनंतर, भारतीय संघाने आता इंग्लंडमधील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकाही गमावली आहे. ब्रिस्टल येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 9 गडी राखून पराभव केला. कर्णधार श्रेयस अय्यरच्या 49 चेंडूंतील नाबाद 80 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या. मात्र, इंग्लंडने केवळ 13.5 षटकांत आणि एका गड्याच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने 35 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या, तर फिल सॉल्टने 42 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 146 धावांची अभेद्य भागीदारी करत इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. विशेष म्हणजे, भारतांविरुद्ध द्विपक्षीय टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताला गेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने गमावणारा तो पहिला भारतीय कर्णधारही ठरला आहे.

चौथ्या सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “हा पुन्हा एकदा निराशाजनक निकाल होता. 158 धावांची धावसंख्या नक्कीच पुरेशी नव्हती. इंग्लंडने किती वेगाने लक्ष्य गाठले हे आपण पाहिले. जेव्हा आम्ही गोलंदाजीसाठी उतरलो, तेव्हा मी गोलंदाजांना शक्य तितक्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सांगितले होते, कारण या खेळपट्टीवर मिडल आणि लेग स्टंपच्या रेषेवर फटके मारणे सोपे नव्हते. मात्र, आम्ही आमच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकलो नाही. जेव्हा जेव्हा आम्ही गोलंदाजीचा वेग बदलण्याचा किंवा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी आमच्या खराब चेंडूंचा पुरेपूर फायदा घेतला.”

श्रेयस अय्यर पुढे म्हणाला, “मी माझ्या वैयक्तिक कामगिरीवर समाधानी आहे. पण जर त्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळत नसेल, तर त्याला फारसे महत्त्व उरत नाही. मला चांगली कामगिरी करायची आहे आणि संघाला विजय मिळवून देण्यात मदतही करायची आहे. दुर्दैवाने, आजचा दिवस आमच्यासाठी अनुकूल नव्हता.”

श्रेयस पुढे म्हणाला, “सध्या संघ एका संक्रमण काळातून जात आहे आणि अशा वेळी चुका होणे स्वाभाविक आहे. अनेक युवा खेळाडू अशा परिस्थितीत पहिल्यांदाच खेळत आहेत. या चुकांमुळे त्यांना परिस्थितीनुसार जुळवून घेण्याचे महत्त्व समजेल. जर त्यांनी या चुका लवकर सुधारल्या, तर त्याचा संघाला फायदा होईल. मला खात्री आहे की आपल्याकडे असे खेळाडू आहेत जे वेगाने शिकणारे आहेत. ते आपल्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करतील आणि पुढील सामन्यात जोरदार पुनरागमन करतील.”

Comments are closed.