पीएम मोदींची ऐतिहासिक घोषणा! भारतात पहिल्यांदाच रंगणार 'बीबीएल'चा सामना; जाणून घ्या सविस्तर…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे ‘बिग बॅश लीग’ (BBL) भारतात आयोजित करण्याबाबत एक मोठी घोषणा केली. त्यांनी जाहीर केले की, आगामी 2026-27 BBL हंगामातील सलामीचा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाईल. या नियोजनाच्या तयारीसाठी, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच संभाव्य स्टेडियम्सची पाहणी करण्यासाठी भारताला भेट दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियातील युवा क्रिकेटपटूंशी संवाद साधला. याप्रसंगी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ हे देखील उपस्थित होते.

परदेशी टी-20 लीगचा सामना भारतात होण्याची ही पहिलीच वेळ असेल. हा सामना 12 डिसेंबर रोजी चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार असून, यात मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात लढत होईल.

‘बिग बॅश लीग’च्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेतील एखादा सामना परदेशात आयोजित केला जाणार आहे. भारतात बीबीएलची लोकप्रियता वाढवण्याच्या उद्देशाने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने हा निर्णय घेतला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये भारत हा सध्या सर्वात प्रभावशाली देश मानला जातो. त्यामुळे भारतीय भूमीवर बीबीएलचे आयोजन केल्यास या स्पर्धेच्या लोकप्रियतेत मोठी वाढ होईल, असा विश्वास ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ला वाटतो.

Comments are closed.