बीसीसीआयने जाहीर केले नव्या टी20 मालिकेचे वेळापत्रक; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने?

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे संघ सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. याच दरम्यान, ‘इंडिया ए’ संघाच्या नेपाळ दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय ‘ए’ संघ याच वर्षी नेपाळचा दौरा करणार असून, तिथे संघ तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. भारताचा संघ पहिल्यांदाच नेपाळचा दौरा करणार आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळने (CAN) शुक्रवारी, (10 जुलै) रोजी अधिकृत निवेदन जारी करून या मालिकेची पुष्टी केली आहे. या दौऱ्याकडे दोन्ही देशांमधील मजबूत द्विपक्षीय क्रिकेट संबंधांच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

​’इंडिया ए’ संघ या वर्षाच्या शेवटी तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी नेपाळचा दौरा करेल. या मालिकेतील पहिला सामना (9 डिसेंबर) रोजी खेळवला जाईल, तर दुसरा सामना 11 डिसेंबरला आणि तिसरा टी20 सामना 13 डिसेंबरला होईल. मालिकेतील तिन्ही सामने कीर्तिपूर येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटीमधील ‘टीयू (TU) इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड’वर खेळवले जातील.

​क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) चे अध्यक्ष चतुर बहादूर चंद, CAN चे सचिव पारस खडका आणि BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांच्यातील बैठकीनंतर या द्विपक्षीय मालिकेवर निर्णय घेण्यात आला. ही मालिका दोन्ही देशांमधील वाढत्या क्रिकेट संबंधांना आणखी मजबूत करेल.

​नेपाळच्या क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारताप्रमाणेच नेपाळमध्येही क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. पहिल्यांदाच नेपाळ दौऱ्यावर जाणाऱ्या ‘इंडिया ए’ संघात आयपीएलचे (IPL) अनेक स्टार्स आणि अनुभवी भारतीय खेळाडूही खेळताना दिसू शकतात. दुसरीकडे, गेल्या काही वर्षांत नेपाळ क्रिकेट संघानेही उत्कृष्ट खेळ दाखवला असून, गेल्या दोन टी20 वर्ल्ड कपसाठी पात्रता (Qualify) मिळवली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीचे आणि रोमांचक सामने होण्याची अपेक्षा आहे आणि नेपाळच्या चाहत्यांना या टी20 मालिकेची उत्सुकतेने प्रतीक्षा असेल.

Comments are closed.