वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया ऑलिम्पिकच्या शर्यतीतून बाहेर? सलग 5 पराभवांचा बसणार फटका!

2026 टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला (Team india) सलग 5 टी20 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या खराब कामगिरीमुळे भारताने सलग दोन मालिका गमावल्या आहेत. सुरुवातीला आयर्लंडविरुद्ध भारताचा 0-2 (Team india losted T20 series against Ireland & also England) असा पराभव झाला, तर त्यानंतर इंग्लंडविरुद्धही टीम इंडियाला मालिका गमवावी लागली. या सलग पराभवांमुळे आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न धोक्यात आले आहे का?

तर, हो असे होऊ शकते. सलग पराभवांचा फटका ऑलिम्पिक पात्रतेवर (Qualification) बसू शकतो. काही दिवसांपूर्वीच आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार, 2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला अशा प्रत्येकी 6-6 संघांना प्रवेश मिळणार आहे. यामध्ये आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशिनिया या खंडांमधून प्रत्येकी एक-एक संघाचे स्थान निश्चित असेल.

याव्यतिरिक्त, यजमान देश म्हणून अमेरिका जर आयसीसी रँकिंगमध्ये टॉप-15 मध्ये राहिली, तर त्यांना थेट प्रवेश मिळेल. उर्वरित सहावे स्थान ‘आयसीसी ऑलिम्पिक क्वालिफायर’ स्पर्धेद्वारे निश्चित केले जाईल.

2026 महिला टी20 वर्ल्ड कपच्या कामगिरीच्या जोरावर भारत, दक्षिण आफ्रिका, ग्रेट ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ ऑलिम्पिकमध्ये खेळणार हे निश्चित झाले आहे. परंतु, पुरुष संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महिला संघाप्रमाणेच भारतीय पुरुष संघालाही ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी आशियातील ‘टॉप टीम’ म्हणून स्वतःला सिद्ध करावे लागेल. 31 डिसेंबर 2026 रोजीच्या आयसीसी रँकिंगच्या आधारावर हे ठरवले जाईल. जर टीम इंडियाचा खराब फॉर्म असाच सुरू राहिला आणि त्यांची रँकिंग घसरली, तर आशियातील अव्वल संघाचा मान त्यांच्याकडून हिरावला जाऊ शकतो. असे झाल्यास भारताचे ऑलिम्पिकमधील स्थान धोक्यात येऊ शकते.

128 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत आहे, अशा वेळी टीम इंडिया आपली जागा टिकवून ठेवणार का, हे पाहणे आगामी काळात अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.