फ्रान्स जिंकला, आफ्रिका हसली!

काल बॉस्टनच्या मैदानावर पहिली शिट्टी वाजली आणि काही मिनिटांतच लक्षात आलं की हा सामना फक्त उपांत्य फेरीचं तिकीट कापण्यासाठी खेळला जाणार नाही. या नव्वद मिनिटांच्या पोटात एक आगळा इतिहास होता. स्थलांतर होतं. वसाहतवादाच्या सावल्या होत्या. आफ्रिकेच्या जखमा होत्या आणि युरोपचा रुबाब होता. दोन देश समोरासमोर होते, पण त्यांच्या रक्तवाहिन्या इतक्या एकमेकांत मिसळलेल्या होत्या की कोण कुणाविरुद्ध खेळतंय, हा प्रश्न स्कोअरबोर्डपेक्षा मोठा वाटत होता.

एका बाजूला दोन वेळचा जगज्जेता होता फ्रान्स. छातीवर स्टार आणि चेहऱ्यावर रुबाब होता. दुसऱ्या बाजूला होता मोरोक्को. डोळ्यांत आग आणि मनात 2022 चा हिशेब मागत होता. तेव्हा फ्रान्सनेच वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत त्यांचं स्वप्न मोडलं होतं. काल पुन्हा समोर तोच फ्रान्स होता. पहिल्या हाफमध्ये मोरोक्कोने फ्रान्सला फुटबॉल खेळू दिले नाही, त्यांना हल्ल्यांची संधी दिली नाही. जागा बंद केल्या. पासिंगचे रस्ते अडवले. एम्बाप्पेच्या वेगासमोर आपली बचावफळी भिडवली. फ्रान्स पुढे सरकला की मोरोक्कोची लाल जर्सींची भिंत समोर यायची. गोलरक्षक बोनो तर जणू म्हणत होता, आज माझ्या घरात प्रवेशासाठी व्हिसा लागेल!

फ्रान्सला पेनल्टी मिळाली. चेंडूसमोर किलियन एम्बाप्पे होता. त्याच्यासमोर बोनो. क्षणभर बॉस्टनने श्वास रोखला. एम्बाप्पे धावला. फटका मारला. पण बोनोने तो रोखला! त्या एका क्षणी मोरोक्कोच्या लाल समुद्राला भरती आली. झेंडे वेडे झाले. ढोल दणाणले. जणू मोरोक्कोने गोल केला नव्हता, इतिहासाच्या गालावर चापट मारली होती, पण मोठे संघ तुमच्या आनंदाला फार वेळ जगू देत नाहीत. एम्बाप्पे पुन्हा आला. यावेळी चुकला नाही. फ्रान्सने आघाडी घेतली. नंतर डेम्बेलेने दुसरा घाव घातला. 2-0. स्कोअरबोर्ड म्हणाला की, फ्रान्स जिंकला. मोरोक्को हरला. फ्रान्स सलग तिसऱयांदा उपांत्य फेरीत पोहोचला. इतिहासाच्या वहीत एवढंच लिहिलं जाईल. बाकी गोष्टी विसरल्या जातील, पण मला काल वेगळाच प्रश्न पडला. फ्रान्स जिंकला… पण फ्रान्स नेमका कुणाचा?

हा प्रश्न विचारताना माझ्या डोळ्यांसमोर फ्रान्सची जर्सी नव्हती. त्या जर्सीच्या आतली माणसं होती. किलियन एम्बाप्पे. जन्म फ्रान्समध्ये. वडिलांची मुळं कॅमेरूनमध्ये. आईची मुळं अल्जेरियात. उस्मान डेम्बेले. फ्रान्सचा नायक. त्याच्या कुटुंबाची मुळं आफ्रिकेत. फ्रान्सच्या संघाकडे नीट पाहिलं की भूगोल गोंधळतो. जर्सी फ्रान्सची असते, पण तिच्या आत आफ्रिकेच्या अनेक पिढ्यांचा इतिहास धडधडत असतो.

मग फ्रान्स नेमका कुणाचा? फक्त आयफेल टॉवरवाल्यांचा? फक्त शाँझ-एलीझेवर फिरणाऱयांचा? फक्त फ्रेंच आडनाव असणाऱयांचा? की पॅरिसच्या उपनगरात छोट्या घरात वाढलेल्या त्या मुलांचाही, ज्याच्या वडिलांनी आफ्रिकेतून येऊन घाम गाळला आणि आईने मुलासाठी फुटबॉलचे बूट घेताना स्वतŠच्या गरजा बाजूला ठेवल्या?

इथेच कालचा सामना फुटबॉलच्या बाहेर गेला. कारण समोर मोरोक्को होतं आणि त्याची कहाणीही तितकीच विलक्षण होती. मोरोक्कोमधील अनेक खेळाडू युरोपमध्ये जन्मले किंवा घडले. कुणी फ्रान्समध्ये, कुणी नेदरलँड्समध्ये, कुणी बेल्जियममध्ये, कुणी स्पेनमध्ये. त्यांना युरोपने फुटबॉल शिकवलं, पण त्यांच्या घरात आई-वडिलांनी मोरोक्को जिवंत ठेवला.

म्हणजे काल गंमत काय होती? फ्रान्सच्या जर्सीत आफ्रिकन मुळं होती आणि मोरोक्कोच्या जर्सीत युरोपमध्ये घडलेली पावलं होती. हा सामना दोन देशांत होता की दोन इतिहासांत? फ्रान्सने आफ्रिकेत राज्य केलं. आफ्रिकेतून लोक फ्रान्समध्ये गेले. त्यांनी तिथे आयुष्य उभारलं. त्यांच्या मुलांनी फ्रेंच शाळांत शिक्षण घेतलं. फ्रेंच मैदानांवर फुटबॉल शिकला. फ्रेंच अकादम्यांत घाम गाळला. आज त्याच स्थलांतरित पिढ्यांची मुलं फ्रान्सला वर्ल्ड कप जिंकवतात. इतिहासाला विनोदाची फार आवड असावी. कालचा गोल एम्बाप्पेने केला नाही. तो स्थलांतराने केला. आज जगभर स्थलांतरितांवर चर्चा होते. सीमा बंद करा. बाहेरच्यांना रोखा. ते आपले नाहीत. ते आपली संस्कृती बदलतात. ते नोकऱ्या घेतात. राजकारणाला ‘बाहेरचा’ माणूस फार उपयोगी पडतो. निवडणुकीत भीती विकायची असेल तर स्थलांतरित हा तयार माल असतो, पण वर्ल्ड कप आला की? तोच स्थलांतरित कुटुंबातील मुलगा गोल करतो. तोच राष्ट्रध्वज खांद्यावर घेतो. तोच राष्ट्रगीत गातो. तोच देशाला उपांत्य फेरीत नेतो आणि अचानक तो ‘बाहेरचा’ राहत नाही. तो ‘आपला हीरो’ होतो.

मला या ढोंगाची गंमत वाटते. हरलास तर तुझ्या मुळांची चौकशी. जिंकलास तर तू आमचा. रस्त्यावर तुझं नाव वेगळं वाटतं, पण स्कोअरबोर्डवर तुझा गोल लागला की नाव फ्रेंच होतं!

हा फक्त फ्रान्सचा प्रश्न नाही. हा संपूर्ण जगाचा प्रश्न आहे. आपण माणसाला स्वीकारतो कधी? तो आपल्या समाजात शांतपणे जगतो तेव्हा, की आपल्या देशासाठी पदक जिंकतो तेव्हा? फ्रान्सच्या फुटबॉलने मात्र एक गोष्ट दाखवली, प्रतिभेला पासपोर्टच्या चौकटीत बंद केलं तर राष्ट्र गरीब होतं. संधी दिली तर उपनगरातून एम्बाप्पे जन्मतो. विविध मुळांतून आलेली मुलं निळी जर्सी घालतात आणि देश त्यांच्या गोलावर नाचतो. फ्रान्सने फक्त स्वतŠचा संघ घडवलेला नाही, त्याच्या अकादम्या, मैदानं आणि प्रशिक्षण व्यवस्थेने अनेक देशांना खेळाडू दिलेत. ही फक्त प्रतिभा नाही. ही व्यवस्था आहे. ही संधी आहे. ही विविधतेतून ताकद निर्माण करण्याची क्षमता आहे.

इथेच मला हिंदुस्थान आठवतो. आपण विचारतो की, 148 कोटी लोकांतून देशाला फक्त अकरा फुटबॉलपटू का मिळत नाहीत? उत्तर कदाचित काल बॉस्टनमध्ये धावत होतं. यासाठी लोकसंख्या पुरेशी नसते. देशप्रेमाच्या घोषणा पुरेशा नसतात. मुलाला मैदान द्यावं लागतं. प्रशिक्षण द्यावं लागतं. व्यवस्था द्यावी लागते. त्याच्या नावाकडे, धर्माकडे, भाषेकडे, प्रदेशाकडे पाहण्याआधी त्याच्या पायातल्या चेंडूकडे पाहावं लागतं

काल स्कोअरबोर्डवर फ्रान्स 2-0 ने जिंकला असेल. पण माझ्या मनात काल एक वेगळाच निकाल लागला. काल फ्रान्स जिंकला. मोरोक्को हरला, पण आफ्रिका पराभूत झाली नाही. कारण या विजयात आफ्रिकेच्या अनेक पिढ्यांचा घाम मिसळलेला आहे. म्हणून फ्रान्स जिंकला अन् आफ्रिका हसली, हेच सत्य आहे.

Comments are closed.