स्मृती मानधनाने लॉर्ड्सवर रचला इतिहास; असा पराक्रम करणारी ठरली पहिली महिला क्रिकेटपटू
भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना सध्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. हा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण कसोटी क्रिकेटच्या 149 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘क्रिकेटचे मक्का’ मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर महिलांची कसोटी खेळली जात आहे. महिला क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता . ज्यामध्ये स्मृती मानधनाने अर्धशतक झळकावल्यामुळे तो अधिकच अविस्मरणीय ठरला.
लॉर्ड्सवर कसोटी अर्धशतक झळकावणारी मानधना पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. तिने शतकाकडेही वाटचाल केली होती, परंतु तिची खेळी 83 धावांवर संपुष्टात आली. मानधनाने 108 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 83 धावा केल्या.
स्मृती मानधनानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा यांनीही अर्धशतके झळकावली.
हरमनप्रीतने 121 चेंडूंत 58 धावा केल्या; तिच्या खेळीत सात चौकारांचा समावेश होता. तर, दीप्ती शर्माने 87 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. तिन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली असली तरी, त्यांना त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही.
मानधना, हरमनप्रीत आणि दीप्ती यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात एकूण 285 धावा केल्या. मात्र, तळाच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली; तळाच्या फलंदाजांनी केवळ 26 धावांचे योगदान दिल्याने भारताचा डाव अपेक्षेपेक्षा लवकर संपला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 11 षटकांत 1 बाद 21 धावा केल्या होत्या. सलामीवीर टॅमी ब्यूमोंटला 2 धावांवर ‘एलबीडब्ल्यू’ (LBW) बाद करून क्रांती गौडने भारताला पहिले यश मिळवून दिले.
Comments are closed.