आंबिस्ते-पाळसई मार्गावरील खड्डे शिवसैनिकांनी भरले
निकृष्ट कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दैना उडाली आहे. आंबिस्ते – पाळसई-असनस या मार्गावरही खड्डे पडले होते. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा अर्ज, विनंत्या करूनही प्रशासन चालढकल करत असल्याने अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पाळसई गावचे शाखाप्रमुख स्वप्नील पाटील व शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन या मार्गावरील खड्डे भरल्याने या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
आंबिस्ते – पाळसई- असनस हा रस्ता या परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने येथून वर्दळ असते. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने दर महिन्याला अपघात होऊन जीवितहानी होत होती. या मार्गावरील खड्डे भरा, असे संबंधित प्रशासनाला अर्ज, विनंती करूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते. अखेर शिवसैनिकांनी पुढाकार घेत स्वखर्चाने खड्डे बुजवल्याने या परिसरातील नागरिकांनी व वाहनचालकांनी शिवसैनिकांना धन्यवाद दिले.
कुदळ-फावडे हाती घेतले
पाळसईचे शाखाप्रमुख स्वप्नील पाटील, उपशाखाप्रमुख कैलास पडवले, विभागप्रमुख विशाल पाटील, उपविभागप्रमुख अनिल डबके, असनसचे शाखाप्रमुख चेतन जाधव, उपशाखाप्रमुख हेमंत भालेराव, कळंबई शाखाप्रमुख नवनीत हिरवे, उपशाखाप्रमुख एकनाथ झोप, नीलेश पाटील, रोहित पाटील, ललित पाटील, तेजस पाटील, गोरख डबके, कल्पेश पाटील, मानस पाटील, वैभव पाटील, संजय बसवत, अक्षय डबके, अजय रिंजट, प्रवीण गवते, डॉ. पराग हरड यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी कुदळ-फावडे हातात घेऊन या रस्त्याचे काम करून दाखवले.
Comments are closed.