‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामागे राजकारणी-कंत्राटदारांचे साटेलोटे; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकल्पातील कंत्राटदार सत्ताधारी पक्षांना निधी पुरवत असल्यामुळे सरकार त्यांना वाचवत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राम मंदिर देणगी प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी आणि नाशिक महाकुंभावरील खर्चाचे लेखापरीक्षण करण्याची मागणीही त्यांनी केली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामागे राजकारणी आणि कंत्राटदारांचे मोठे साटेलोटे आहे. मुसळधार पावसानंतर प्रकल्प परिसरात दरडी कोसळल्यानंतरही सरकार प्रकल्पाचे समर्थन करत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पडलेल्या भेगा आणि इतर त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या नवयुगा आणि अॅफकॉन्ससारख्या मोठ्या कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांचे संरक्षण करत आहे. कारण या कंपन्या सत्ताधारी पक्षांना आर्थिक मदत करतात, असा आरोप त्यांनी केला.
Comments are closed.