गुटखा तस्करीचा ‘हायटेक’ फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; ‘असा’ झाला भ
नाशिक क्राईम न्यूज : अवैध गुटखा तस्करीसाठी गुन्हेगार नवनवीन आणि थक्क करणाऱ्या क्लृप्त्या शोधत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका अशा हायटेक तस्करीचा पर्दाफाश झाला आहे, जिथे पोलिसांना चकवा देण्यासाठी थेट रिमोट कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. या धडक कारवाईत देवळा पोलिसांनी सुमारे 14 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका संशयिताला अटक केली आहे, तर मुख्य सराईत तस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
नाशिक क्राईम न्यूज : रिमोट डबले यांची नंबर प्लेट गायब
या कारवाईत पोलिसांनी जेव्हा संशयित मारुती सुझुकी इर्टिगा कारची तपासणी केली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. तस्करांनी पोलिसांची आणि सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या नंबर प्लेटवर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा एक काळा पडदा बसवला होता. रस्त्यावर पोलीस दिसताच गाडीतील रिमोटचे बटण दाबायचे आणि काही क्षणांत नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जायची. या अत्याधुनिक युक्तीमुळे आजवर ही कार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होत होती.
Nashik Crime News: ग्रामस्थांनी गाडी अडवली अन् तस्करीचा भांडाफोड झाला
बुधवारी रात्री विठेवाडीच्या आहेर वस्तीजवळ या इर्टिगा कारच्या संशयास्पद हालचाली ग्रामस्थांच्या नजरेस पडल्या. त्यांनी तातडीने एकजूट दाखवून वाहन अडवले आणि देवळा पोलिसांच्या स्वाधीन केले. नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या वाहनातून मोठ्या प्रमाणावर विमल पानमसाला आणि व्ही-1 तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 4 लाख 92 हजार 200 रुपये असून, 10 लाख रुपयांची कार मिळून एकूण 14 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Nashik Crime News: एकाला अटक, सराईत गुन्हेगारावर ‘मोक्का’ लावण्याची तयारी
या प्रकरणी पोलिसांनी हेमंत प्रभाकर पवार या संशयिताला अटक केली आहे. मात्र, मुख्य सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार आरोपी कुणाल मेने याच्याविरुद्ध यापूर्वीच देवळा, वणी आणि दिंडोरी पोलीस ठाण्यांमध्ये गुटखा तस्करीचे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो संघटितपणे हा गुन्हा करत असल्याने त्याच्याविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. देवळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Comments are closed.