FIFA World Cup 2026 – ‘हॅण्ड ऑफ गॉड’चे भूत पुन्हा जागे!
उपांत्य फेरीत अर्जेंटिना आणि इंग्लंड आमनेसामने येणार हे निश्चित होताच सोशल मीडियावर फुटबॉलचा इतिहास पुन्हा जिवंत झाला. ‘एक्स’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’ आणि ‘यूट्यूब’वर १९८६ च्या मेक्सिको वर्ल्ड कपमधील दिएगो मॅराडोनाचा ‘हॅण्ड ऑफ गॉड’ गोल आणि त्यानंतर पाच इंग्लिश खेळाडूंना चकवत केलेला ‘गोल ऑफ द सेंच्युरी’ पुन्हा व्हायरल झाला. चाळीस वर्षांपूर्वीची ती लढत आजही फुटबॉलच्या सर्वात मोठ्या वैराचे प्रतीक मानली जाते.
१९८६ च्या इतिहासाचे कथानक मात्र नव्या नायकांच्या हाती आहे. अर्जेंटिनाचा महानायक लिओनेल मेस्सी आपल्या अनुभव, अचूक पास आणि अप्रतिम खेळदृष्टीच्या बळावर संघाला आणखी एका अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर आणून उभा आहे. त्याचवेळी ज्युलियन अल्वारेझ निर्णायक क्षणी गोल करणारा अर्जेंटिनाचा नवा शिलेदार ठरत आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा ज्यूड बेलिंगहॅम या स्पर्धेतील सर्वात प्रभावी युवा खेळाडू म्हणून झळकतोय, तर हॅरी केनचा अनुभव आणि गोल करण्याची हातोटी इंग्लंडची सर्वात मोठी ताकद मानली जात आहे.
हा उपांत्य सामना बुधवारी रात्री रंगणार असला तरी, डिजिटल विश्वात युद्धाला सुरुवात झाली आहे. अर्जेंटिनाचे चाहते ‘हॅण्ड ऑफ गॉड’ ची आठवण जागवत आहेत, तर इंग्लंडचे समर्थक ४० वर्षांचा हिशेब चुकता करण्याची भाषा करत आहेत. लाखो पोस्ट, मीम्स, व्हिडीओ आणि चर्चामुळे अर्जेटिना-इंग्लंडची उपांत्य फेरी मैदानावर रंगण्यापूर्वीच सोशल मीडियावर सुपरहिट ठरली आहे. फुटबॉलच्या इतिहासात चेंडूची लढाई जितकी गाजली, तितकीच आता ‘हॅशटॅग’ची लढाईही रंगताना दिसतेय. त्यामुळे ही उपांत्य लढतही अंतिम लढतीच्याच तोडीची असेल.
Comments are closed.