127 किलोचा क्रिकेटर, एका कॅचने बनला वर्ल्ड कपचा हिरो; आता कुठे आहे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक?

2007 चा वन-डे वर्ल्ड कप भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक आणि वेदनादायी ठरला असला, तरी या विश्वचषकात एका अशा खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, ज्याची चर्चा आजही क्रिकेट जगतात केली जाते. तो खेळाडू म्हणजे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक (Dwayne Leverock). 19 मार्च 2007 रोजी टीम इंडिया विरुद्ध झालेल्या सामन्यात ड्वेन लेवरॉकने घेतलेला एक अद्भूत कॅच क्रिकेट इतिहासातील सर्वात सर्वोत्तम कॅचपैकी एक मानला जातो. आज 14 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असून, या निमित्ताने त्यांच्या त्या ऐतिहासिक कामगिरीची आणि सध्या ते काय करत आहेत याची जोरदार चर्चा रंगली आहे.

तो ऐतिहासिक कॅच अन्…

भारताविरुद्धच्या सामन्यात जेव्हा ड्वेन लेवरॉक स्लिपमध्ये फिल्डिंग करत होते, तेव्हा त्यांनी भारताचा फलंदाज रॉबिन उथप्पाचा हवेत सूर मारत एका हाताने अप्रतिम कॅच घेतला. सुमारे 127 किलो वजन असलेल्या लेवरॉकची ही चपळाई पाहून मैदान, खेळाडू आणि प्रेक्षक सगळेच अवाक झाले. त्या क्षणी कॉमेंटेटर डेव्हिड लॉयड यांनी केलेले उद्गार आजही चाहत्यांच्या कानात गुंजतात, “The big man, the fridge has opened.”

कॅच घेतल्यानंतर ड्वेन लेवरॉक यांनी मैदानावर धावत सुटत केलेला जल्लोष प्रचंड व्हायरल झाला होता आणि ते रातोरात स्टार बनले होते. याच सामन्यात त्यांनी भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंगची विकेट देखील घेतली होती. मात्र, गोलंदाजीत त्यांनी 10 ओव्हर्समध्ये 96 धावा दिल्या होत्या. भारताने हा सामना 257 धावांनी जिंकला होता, परंतु दुर्दैवाने भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता.

ड्वेन लेवरॉक यांची क्रिकेट कारकीर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वजनदार खेळाडूंपैकी एक असलेल्या लेवरॉक यांना त्यांचे सहकारी प्रेमाने ‘स्लगो’ (Sluggo) या नावाने हाक मारायचे. वन-डे क्रिकेटमध्ये त्याने 32 सामने खेळले आणि 34 विकेट्स घेतल्या. यासोबत 2 टी-20 सामने खेळले, पण एकही विकेट घेता आली नाही.

आता कुठे आहेत ड्वेन लेवरॉक?

एप्रिल 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ड्वेन लेवरॉक यांनी एक वेगळी वाट निवडली. जेल अधिकारी म्हणून कार्यरत: क्रिकेट सोडल्यानंतर ते बर्म्युडामध्ये जेल अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. नोकरी सांभाळत ते अनेकदा पार्ट-टाइम क्रिकेट कमेंट्री करताना देखील दिसतात. आजही बर्म्युडामध्ये त्यांना एक अत्यंत लोकप्रिय आणि आदराचे स्थान असलेले क्रीडा व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानावरील त्यांची ती ‘डाइव्ह’ आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

हे ही वाचा –

Virat Kohli And Gautam Gambhir : एकमेकांकडे बघितलही नाही, बोललेही नाही; विराट कोहली अन् गौतम गंभीरमध्ये काय घडलं?, सराव करताना मैदानात सगळं दिसलं!

Comments are closed.