बद्रीनाथ दान चोरीप्रकरणी प्रमोद नौटियालला अटक
सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वपूर्ण पुरावे प्राप्त
वृत्तसंस्था/ बद्रीनाथ
उत्तराखंडमधील चमोली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बद्रीनाथ धाममधील देणगी चोरीप्रकरणी बद्री-केदार मंदिर समितीचे (बीकेटीसी) निलंबित वैयक्तिक सहाय्यक प्रमोद नौटियाल याला अटक केली आहे. एसआयटीने त्याला 12 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास देहराडूनमधील नेहरू कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांचे चित्रण त्यात आढळले. या फुटेजमध्ये मंदिरातून चलनी नोटा, सोन्या-चांदीची नाणी, शालिग्राम आणि केशराची पाकिटे बेकायदेशीरपणे काढून नेल्याच्या घटना निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
बद्रीनाथ धाममधील देणगी चोरीप्रकरणी 8 जुलै 2026 रोजी श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे प्रभारी मंदिर अधिकारी युधवीर पुष्पवन यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे, श्री बद्रीनाथ कोतवाली येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 306 आणि 316(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचदरम्यान बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार गठीत केलेल्या विभागीय चौकशी समितीने केलेल्या प्राथमिक तपासात मंदिर समितीचा कर्मचारी प्रमोद नौटियाल याने देणगीची मोजणी करण्याच्या ठिकाणाहून बेकायदेशीरपणे आणि गुप्तपणे स्वत:च्या फायद्यासाठी पैसे आणि इतर वस्तू पळवून नेल्याचे दिसून आले.
एसआयटीचा सखोल तपास
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, चमोलीचे पोलीस अधीक्षक सुरजीत सिंग पनवार यांच्या निर्देशानुसार आणि चमोलीचे सर्कल ऑफिसर मदन सिंग बिष्ट यांच्या निकट देखरेखीखाली एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. एसआयटीच्या तपासादरम्यान, घटनास्थळाची कसून पाहणी करण्यात आली. फिर्यादी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. याव्यतिरिक्त देणगीची मोजदाद होत असलेल्या खोलीतील त्याचा वावरही संशयास्पद आढळून आला होता. सदर खोलीतून तो पैसे आणि इतर दानवस्तून मोबाईल फोनखाली किंवा खिशात लपवून नेत असे.
Comments are closed.