क्रिकेटच्या मैदानावरच काळाने घाला घातला; षटक पूर्ण करताच गोलंदाज कोसळला, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानात क्रिकेट म्हणजे खेळाडूंसाठी जीव की प्राण. देशासाठी खेळायचं स्वप्न उराशी बाळगून अनेक खेळाडू मैदानावर दिवस-रात्र घाम गाळतात. यासाठी खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून आयपीएलच्या धर्तीवर देशभरात अनेक लीग स्पर्धांचे आयोजन करण्यात येतं. अशाच एका जम्मू-कश्मीरमधील भलेसा चिनाब प्रीमियर लीगमध्ये (BCPL) एक तरुण खेळाडू आपल्या खेळाची झलक दाखवण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र, या स्पर्धेदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. गोलंदाजी पूर्ण केल्यानंतर खेळाडू खेलपट्टीवर कोसळला. त्याला सहकारी खेळाडूंनी तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मृत खेळाडूची ओळख सुहैल अशी झाली असून, तो ‘बादशाह 11 भलेसा’ संघाकडून ‘वायसीसी जिमखाना किश्तवाड’ विरुद्ध खेळत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुहैलने त्याचे दुसरे षटक पूर्ण केले होते. षटक संपल्यानंतर तो आपल्या शूजची लेस बांधण्यासाठी खाली वाकला. मात्र, उभे राहताच त्याची तब्येत बिघडली आणि तो स्वतःचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू लागला. काही सेकंद स्वतःला सावरत चालण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो अचानक मैदानावरच कोसळला. हे पाहून इतर खेळाडू आणि मैदानावर उपस्थित असलेले लोक तातडीने त्याच्या मदतीसाठी धावले. सामन्याच्या थेट प्रक्षेपणात एक वाहन थेट मैदानात आले आणि त्यातून सुहैलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सुहैल हा जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भद्रवाह परिसराचा रहिवासी होता. सध्या त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच ते समोर येईल.

या दुर्घटनेपूर्वी सुहैल मैदानात उत्कृष्ट कामगिरी करत होता. त्याने आपल्या दोन षटकांच्या गोलंदाजीत अवघ्या 8 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले होते. तत्पूर्वी, त्याच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 12 षटकांत 147 धावांचा डोंगर उभारला होता, ज्यामध्ये आदिल मीरने 38 चेंडूत 75 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. हा सामना गंडोह तहसीलच्या थलोरन येथील स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळवला जात होता. या घटनेनंतर आयोजकांनी स्पर्धा तात्काळ थांबवली.

Comments are closed.