हिंदुस्थान पॅलेस्टाईनचा विश्वासू भागीदार राहणार, टू-स्टेट सोल्युशनला दिला पाठिंबा; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्रसेल्स येथे आयोजित पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या दुसऱ्या मंत्रिस्तरीय बैठकीत हिंदुस्थानने पॅलेस्टाईनला आपला दीर्घकालीन पाठिंबा जाहीर केला आहे. या बैठकीत हिंदुस्थानने टू-स्टेट सोल्युशन आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या सदस्यत्वाला आपला पाठिंबा पुन्हा एकदा स्पष्ट केला. युरोपीय आयोग आणि पॅलेस्टाईन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्रीप्रिया रंगनाथन यांनी केले. या बैठकीला युरोपीय संघाचे सदस्य देश, पॅलेस्टाईन, आंतरराष्ट्रीय भागीदार आणि वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बैठकीला संबोधित करताना श्रीप्रिया रंगनाथन म्हणाल्या की, हिंदुस्थान दीर्घकाळापासून पॅलेस्टिनी जनतेचा विश्वासू भागीदार राहिला आहे. हिंदुस्थानची विकासात्मक मदत ही मागणीवर आधारित असून ती प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, क्षमता बांधणी आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर केंद्रित आहे.

श्रीप्रिया रंगनाथन यांनी माहिती दिली की, हिंदुस्थान पॅलेस्टाईनमध्ये आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि संस्थात्मक क्षमता बांधणीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत आहे. यासोबतच हिंदुस्थानने पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाशी संबंधित अनेक नवीन प्रकल्पांचीही घोषणा केली.

ब्रसेल्स दौऱ्यादरम्यान श्रीप्रिया रंगनाथन यांनी संयुक्त राष्ट्र मदत आणि कार्य संस्थाच्या सल्लागार आयोगाच्या आगामी अध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीतही भाग घेतला. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईन मधील संस्थेच्या मानवतावादी कार्यासाठी हिंदुस्थानचा पाठिंबा दर्शवला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हिंदुस्थान पॅलेस्टिनी जनतेच्या मानवतावादी गरजा पूर्ण करण्यासाठी एक वचनबद्ध आणि विश्वासू भागीदार राहील आणि भविष्यातही ठोस सहकार्य सुरू ठेवेल.

Comments are closed.