चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; संजय राऊत काय म्हणाले?

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे हा माणूस संवाद साधण्यासाठी चांगला आहे, सभागृहातही पॉझिटिव्ह असतो… हे कौतुकाचे उद्गार आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे. संजय राऊत यांनी आतापर्यंत भाजपच्या नेत्यांवर अनेकदा आसूड ओढले आहेत, आपल्या शैलीत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राऊतांनी बावनकुळेंचं (Chandrashekhar Bawankule) कौतुक केल्याने आता त्याची चर्चा रंगल्याचं चित्र आहे.

नागपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 18 जुलै रोजी रामरक्षा पठण होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या विरोधात होणाऱ्या या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह विदर्भातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांनी नागपुरात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक केल्याचं दिसून आलं.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपमध्ये बदल होतील असं भाकीत केलं होतं. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडतील, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याच वक्तव्याचा संदर्भ घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे हे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस असल्याचं वक्तव्य केलं. त्याचवेळी येत्या काळात भाजपमध्ये काही अंतर्गत बदल होतील, असंही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस आहे. इतर पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत असं संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले अंबादास दानवे यांनीदेखील बावनकुळेंचं कौतुक केलं. बावनकुळे हे पॉझिटिव्ह आहेत, सभागृहात कधीही नकारात्मक भूमिका घेत नाहीत, असं अंबादास दानवे म्हणाले.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा पठणासंबंधी नियोजन बैठकीमध्ये सर्व नियोजन करण्यात आलं, मात्र त्याचवेळी या चर्चेदरम्यान संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं केलेल्या कौतुकाबद्दल आता राजकीय चर्चा रंगल्याचं दिसून येतंय.

येत्या 18 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपुरातील राम मंदिर परिसरात सामूहिक रामरक्षा पठण आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरबाहेर सभा घेण्याचे नियोजन आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.