…तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; सुधीर मुनगंटीवार स्पष्टच सांगितलं

सोलापूर : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही वर्षात अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, आता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील सत्तेत येणार असून महायुती सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर दौऱ्यावर आलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं आहे, आता महायुतीत कुणीही येणार नाही. त्यामुळे, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष (NCP) महायुतीत येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

सुधीर भाऊ मुनगंटीवार आज सपत्नीक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष नेत्याचे काम करीत असल्याची टोलेबाजी त्यांच्यावर होत असताना आज नेमके काय बोलणार याची उत्सुकता पत्रकारांना होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या शैलीत टोलेबाजी केली. राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे सर्वोच्च नेते असून त्यांनी 15 दिवसांपूर्वी शरद पवार यांची एनसीपी हा भाजपसोबत असणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. आता, त्यानंतर पुन्हा अशा चर्चा सुरू झाल्या असतील, आणि 15 दिवसांत तसं झाल्यास जनतेच्या मनात नेत्यांबद्दल विश्वास उरणार नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे म्हटले.

एकनाथ शिंदेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रश्नच येत नाही

राजकारणात महत्त्वकांक्षा असणे गैर नाही आणि ही महत्त्वाकांक्षा नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये असते. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, मोठा व्हावा असे वाटत असते आणि यात काहीही गैर नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर मुनगंटीवार यांनी भूमिका मांडली. एकनाथ शिंदे हे भाजपचे मित्र असून भाजप विरोधात असताना सत्ता सोडून ते भाजप सोबत आले. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रश्नच येत नाही आणि तसे असेल तर ते जनतेलाही खपणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली. राजकीय क्षेत्रात कोणीच कोणाचे महत्त्व कमी करू शकत नाही, नेत्याच्या चुकांमुळे पक्षाचे महत्त्व कमी होते. मात्र, जोपर्यंत तो नेता जनतेत आहे, तोपर्यंत त्याचे महत्त्व कमी होत नसते, असे म्हणत एकप्रकारे सुधीर मुनगंटीवारांनी काही नेत्यांना टोला लगावला.

मंत्रिमंडळ विस्तारावरही केलं भाष्य

मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल याची माहिती राज्यातल्या कोणत्याही भाजपच्या लहान कार्यकर्त्यापासून सर्वोच्च नेत्यापर्यंत कोणीही सांगू शकत नाही. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या असतील तर, 75 टक्के हा विस्तार आता होणार नाही हे मी अनुभवाने सांगतो असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा फेटाळल्या आहेत.

हेही वाचा

Comments are closed.