मोबाईलच्या टॉर्चमध्ये प्रसूती करून बाळ, बाळंतिणीला वाचवले, शिव आरोग्य सेनेने केला डॉक्टरांचा सन्मान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस, रस्त्यांची झालेली बिकट अवस्था आणि वीज गेल्यामुळे निर्माण झालेले अंधाराचे साम्राज्य, या प्रतिकूल परिस्थितीत मोबाईलच्या टॉर्चमध्ये एका महिलेची सुखरूप प्रसूती करणाऱ्या देवदूतांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेनेने गौरव केला आहे. करजत तालुक्यातील मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती करवंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्तव्यापुढे अंधाराला हरवून बाळ आणि बाळंतिणीचा जीव वाचवला होता. त्यांच्या या सेवेची शिव आरोग्य सेनेने विशेष दखल घेतली आहे.

वीज प्रवाह खंडित असतानाही वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती करवंदे यांनी या महिलेची सुखरूप प्रसूती केली. हे वृत्त दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईबर, ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे, जिल्हा परिषद सदस्य मारुती घारे, कल्याण (ग्रामीण) विधानसभा समन्वयक अजित माने, सुशांत भुईंबर यांनी डॉ. प्रीती करवंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव केला.

मनुष्यबळ उपलब्ध करा!

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अखंड वीजपुरवठा, अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा, पुरेसा औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शिव आरोग्य सेनेच्या वतीने यावेळी करण्यात आली. मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही यावेळी शिव आरोग्य सेनेच्या वतीने देण्यात आले.

Comments are closed.