FIFA World Cup 2026 – जेतेपद राखण्यासाठी अर्जेंटिनापुढे आता स्पेनचे आव्हान; इंग्लंडच्या स्वप्नांचा चुराडा
लिओनेल मेस्सीच्या अप्रतिम नेतृत्वाखाली गतविजेत्या अर्जेंटिनाने इंग्लंडला अखेरच्या क्षणी जबरदस्त धक्का देत 2-1 असा थरारक विजय मिळवला आणि फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. सामना अतिरिक्त वेळेत जाण्याच्या उंबरठय़ावर असताना बदली खेळाडू लौतारो मार्टिनेझने 92 व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक हेडरने इंग्लंडच्या स्वप्नांचा चुराडा केला. आता दक्षिण अमेरिकन विजेत्या अर्जेंटिनाला जेतेपद राखण्यासाठी रविवारी न्यू जर्सी स्टेडियमवर युरोपियन विजेत्या स्पेनचे आव्हान असेल.
सामन्याच्या 55 व्या मिनिटाला अँथनी गॉर्डनने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर तब्बल 30 मिनिटे इंग्लंडने बचावावर भर दिला, मात्र अखेरच्या क्षणी मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. 85 व्या मिनिटाला मेस्सीच्या अचूक पासवर एन्झो फर्नांडेझने शानदार गोल करत अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुखापत भरपाई वेळेच्या दुसऱया मिनिटाला मेस्सीने टाकलेल्या अप्रतिम क्रॉसवर लौतारो मार्टिनेझने हेडरद्वारे विजयी गोल झळकावला आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांमध्ये जल्लोष उसळला.
या विजयासह अर्जेंटिनाने सलग दुसऱयांदा विश्वचषक जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. 1962 मध्ये ब्राझीलनंतर कोणत्याही संघाला सलग दोनदा विश्वचषक जिंकता आलेला नाही. आता अर्जेंटिनासमोर याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. 39 वर्षीय मेस्सीच्या कारकीर्दीतील ही तिसरी विश्वचषक अंतिम फेरी ठरणार असून ब्राझीलच्या दिग्गज पैफूनंतर हा पराक्रम करणारा तो केवळ दुसरा फुटबॉलपटू ठरणार आहे.
इंग्लंडचे स्वप्न भंगले
1966 नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची इंग्लंडची संधी शेवटच्या काही मिनिटांत धुळीस मिळाली. ज्युड बेलिंगहॅम आणि कर्णधार हॅरी केन यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. गॉर्डनच्या गोलनंतर इंग्लंडने बचावात्मक भूमिका स्वीकारली आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागली. आता इंग्लंडला शनिवारी मियामी येथे तिसऱया स्थानासाठी फ्रान्सविरुद्ध सामना खेळावा लागणार आहे.
अर्जेंटिनाच वरचढ
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी सावध खेळ केला. सततच्या फाऊल्समुळे सामन्याचा ज्वर टिपेला पोहोचला होता. इलियट अॅण्डरसनला मेस्सीला पाडल्याबद्दल पिवळे कार्डही दाखवण्यात आले. दुसऱया हाफमध्ये गॉर्डनच्या गोलनंतर अर्जेंटिनाने आक्रमणाची धार वाढवली. निको गोंझालेझचा हेडर जॉर्डन पिकपर्ह्डने अप्रतिमरीत्या रोखला, तर अॅलेक्सिस मॅक ऑलिस्टरचा फटका खांबाला लागला. अखेर फर्नांडेझने बरोबरी साधली आणि लौतारोने अखेरच्या क्षणी निर्णायक घाव घालत अर्जेंटिनाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
Comments are closed.