एसी लोकलमध्ये भिकारी, गर्दुल्ले वाढले, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवासी सुरक्षा धोक्यात
मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल ट्रेनमध्ये भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा उपद्रव वाढला आहे. आधीच किरकोळ कारणावरून हाणामारी, हत्या यांसारख्या गंभीर घटना घडत आहेत. त्यातच रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भिकारी आणि गर्दुल्ले बिनदिक्कतपणे एसी ट्रेनमध्ये घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे प्रवासी सुरक्षा धोक्यात असल्याची भीती प्रवासी संघटना व दक्ष प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
सद्यस्थितीत मध्य रेल्वे मार्गावर एकूण 120 एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. यामध्ये मेन लाईनवरील 92 आणि हार्बरवरील 28 फेऱ्यांचा समावेश आहे. सुरक्षित आणि आरामशीर प्रवास करण्याच्या हेतूने अनेक प्रवासी एसी लोकलकडे वळू लागले आहेत. मात्र प्रत्यक्षात रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एसी लोकलचा प्रवासही असुरक्षितच असल्याची वस्तुस्थिती आहे. मध्य रेल्वे मार्गावर आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांची संख्या अपुरी आहे. त्याचा गैरफायदा भिकारी आणि गर्दुल्ल्यांकडून घेतला गेल्याचे एसी लोकल प्रवासात आढळून येत आहे. तुलनेत कमी प्रवासी संख्या असलेल्या हार्बरवरील एसी लोकल ट्रेनमध्ये अनधिकृत प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. या मार्गावर तिकीट तपासणीसांचे प्रमाणही कमी आहे.
कर्मचारी तैनात करा!
प्रशासनाने एसी ट्रेनमध्ये टीसींसोबत पुरेसे सुरक्षा कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक व महिलांना भयमुक्त प्रवास करता येईल, असे मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ अॅड. मनोज कोंडेकर यांनी सांगितले.
Comments are closed.