पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हरियाणातील जिंद येथे नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन

वृत्तसंस्था/ जिंद (हरियाणा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद येथून शुक्रवारी देशातील पहिल्या आधुनिक हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही विशेष ट्रेन जिंद आणि सोनीपत दरम्यान धावेल. या सेवेमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही. भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. हे नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान धुराऐवजी केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित करेल. आता अशा प्रकारच्या ट्रेन्स चालणाऱ्या चीन, अमेरिका आणि जर्मनी या जगातील निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.

भारताने वाहतूक क्षेत्रात एक मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेली हायड्रोजन ट्रेन सुरुवातीला जिंद आणि सोनीपत दरम्यान 89 किलोमीटरच्या मार्गावर धावेल. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी असून हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित असून ती हवेतून मिळवलेल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर चालते. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही ट्रेन केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित करते. 32,000 हॉर्सपॉवर क्षमतेसह, ही जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन आहे. या सेवेमुळे प्रदूषण पूर्णपणे नाहीसे होईल, असा दावा केला जात आहे.

32,000 अश्वशक्ती : जगातील सर्वात शक्तिशाली

10 डब्यांची जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन

2,600 प्रवाशांची एकूण क्षमता : जगात सर्वाधिक

आश्चर्यकारक गती

डिझाइन वेग : 110 किमी/तास

सुरुवातीचा वेग : 75 किमी/तास

वैशिष्ट्यो

शून्य उत्सर्जन : पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित

स्वदेशी तंत्रज्ञान : भारतात बनवलेले व डिझाइन केलेले

ऊर्जेचे एक नवे पर्व : हरित ऊर्जेच्या दिशेने मोठे पाऊल

उद्दिष्ट : स्वच्छ, शांत, शाश्वत वाहतुकीसाठी एक उपाय

देशासाठी अभिमानाची बाब…

देशात अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होणे ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हायड्रोजन हे भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून, ते भारतात पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान मोठ्या ट्रक आणि जहाजांमध्ये सहजपणे वापरले जाईल.

– अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री

मुलांचा अद्भुत अनुभव

हायड्रोजन ट्रेनच्या उद्घाटनानंतर या नवीन आणि आश्चर्यकारक रेल्वेमधून प्रवास केलेल्या शालेय मुलांनीही आपले अद्भुत अनुभव देशासोबत शेअर केले. आज जिंदच्या लोकांसाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. आज जिंदचे नाव देशभरात प्रसिद्ध झाले आहे, असे मुलांनी सांगितले. या विशेष प्रदूषणमुक्त ट्रेनचे सर्वांनी मोठ्या उत्साहाने आणि आपुलकीने स्वागत केले.

Comments are closed.