कबड्डी दिनी घोषणांचा पाऊस अन् निवडणुकीचा गंध; पाटील, खटावकर यांना जीवनगौरव; मंगेश वरवडेकर यांचाही सन्मान
कबड्डीमहर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी दिन सोहळ्यात यंदा पावसाने हजेरी लावली नाही, मात्र घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले दिग्गज, ज्येष्ठ, प्रशिक्षक, प्रशासक आणि किशोरवयीन खेळाडू यांच्या उपस्थितीत राज्य कबड्डी संघटनेकडून कबड्डी जिल्हा संघटनांच्या विकासासाठी घोषणा करण्यात आल्या.
कबड्डी दिनी घोषणांच्या या वर्षावामुळे सोहळ्यात राजकीय आणि संघटनात्मक गणिताचीच अधिक चर्चा रंगली. राज्य कबड्डी संघटनेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा संघटनांना आकर्षित करण्यासाठीच या घोषणा करण्यात आल्याची भावना अनेक माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि दिग्गज कबड्डीपटूंनी व्यक्त केली. या सोहळ्यात उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सीएसआर निधीतून प्रत्येक संघटनेला आगामी 2 महिन्यांत 10 लाखांचे आर्थिक बळ देण्याचे आश्वासन तसेच आगामी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने अजिंक्यपद पटकावल्यास खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले.
रत्नागिरीच्या देसाई बँक्वेटमध्ये हा सोहळा झाला. या सोहळ्यात कबड्डीतील दिग्गज दिनकर पाटील आणि शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच दैनिक ’सामना’चे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, राज्य संघटनेचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, उपाध्यक्ष भाई जगताप, सरकार्यवाह माधव गायकवाड, खजिनदार मंगल पांडे यांच्या उपस्थितीत 60 पेक्षा अधिक कबड्डी संघटक, खेळाडू आणि कार्यकर्ते यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून आत्माराम घेगडे, बंड कांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल, विलास सावंत यांचा गौरव केला, तर मुंबईच्या शशिकांत कोरगावकर यांना ज्येष्ठ खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे, त्यांची नात सेरेना म्हसकर हिलाही शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून अखिल हिंदुस्थानी दर्जाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणाऱया निवृत्ती देसाई यांना कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. तसेच सोपान काकडे, सदानंद जोशी, अभिजित राणे यांचाही सन्मान केला.
Comments are closed.