सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडणे ही केंद्र सरकारच्या गच्छंतीची सुरुवात; अंबादास दानवे यांचा हल्लाबोल
पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले होते. गेल्या 21 दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते. मात्र शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून नेले. यावरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेना नेते, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडणे, ही केंद्र सरकारच्या गच्छंतीची सुरुवात आहे, असा घणाघाद दानवे यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत केला.
सोनम वांगचुक यांचे सनदशीर मार्गाने चाललेले आंदोलन ते चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची साधी मागणी होती. जर सरकारला त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल, तर त्यांनी तसे स्पष्ट करायला हवे होते. आम्ही राजीनामा घेणार नाही, आम्ही धर्मेंद्र प्रधान यांना वाचवणार आहोत हे सरकारने जाहीर करायला हवे होते. किमान चर्चा करून या गोष्टी सांगणे गरजेचे होते, असे अंबादास दानवे म्हणाले.
ताकदीच्या जोरावर निर्लज्जपणे लोकशाहीची मोडतोड केली जातेय, हे जग पाहतंय… आदित्य ठाकरे यांचा घणाघात
गेल्या अनेक दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाचा गळा आवळण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचा आरोप दानवे यांनी केला. गेले 20-21 दिवस हे आंदोलन शांततेत सुरू आहे. असे असताना सोनम वांगचुक यांच्यासारख्या समाजसेवेचे व्रत घेतलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला पोलिसांनी ओढत आणि उचलून नेणे हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या या कारवाईची तुलना त्यांनी थेट आणीबाणीच्या काळाशी केली. मात्र सोनम वांगचुक यांचे आंदोलन अशा पद्धतीने चिरडणे हेच आता या दडपशाही करणाऱ्या सरकारच्या स्वतःच्या गच्छंतीची सुरुवात आहे, हे स्पष्ट दिसते आहे, असेही अंबादास दानवे ठामपणे म्हणाले.
सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडणे ही केंद्र सरकारच्या गच्छंतीची सुरुवात; अंबादास दानवे यांचा हल्लाबोल pic.twitter.com/RluLarwdUl
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 18 जुलै 2026
Comments are closed.