लाल दिव्याच्या गाड्या, पोहणं, फुफाट्यात लोळणं, घाबरवणं, रोहित दोन महिन्यांचा असताना….; अजितदा

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर आज पहिलीच जयंती आहे. बारामती येथे २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार (Ajit Pawar) यांचं निधन झालं होतं. आज सकाळच्या सुमारास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या (Ajit Pawar) स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार, जय पवार देखील उपस्थित होते. त्याचबरोबर पवार परिवारातील सदस्यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले,   अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच जयंती असल्याने कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्येही अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळत आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या जयंती दिनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार (Rajendra Pawar)  यांनी अजितदादांच्या जयंती दिनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी त्या दोघांनी सोबत घालवलेलं बालपण, सुट्ट्या ते लाल दिव्यांची गाडी या सर्व गोष्टी तसेच रोहित पवारांना राजकारणात दिलेली शिकवण आणि साथ याबाबत देखील त्यांनी लिहलं आहे.(Rajendra Pawar) त्याचबरोबर त्यांचे आणि अजित पवारांचे लहानपणापासूनचे फोटो शेअर केले आहेत.

Rajendra Pawar Social Media Post: राजेंद्र पवार यांनी पोस्ट

“२२ जुलै,आज तू ६७ वर्षे पूर्ण,म्हणजे माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान. डोळ्यापुढून सारा काळ सरकतो.आपण ४-५ वर्षाचे असताना तू रात्री बारामतीत कंदील घेऊन पळून जाऊन अंधाराची भीती दाखवे,उन्हाळ्यात फाट्यात पोहून फुफाट्यात आपण रस्त्यावर लोळलो.त्यावेळी पाटकऱ्याला आपण घाबरलो पण मोठेपणी त्याच खात्याचा तू मंत्री झालास.शाळेचे सर्टिफिकेट आणताना घाबरून घरी न जाता मुंबईला शाळा उघडेपर्यंत चौपटीवरच बसलो.जाणाऱ्या लाल दिव्याच्या गाड्या पाहून आपण असे कधी होणार म्हणता-म्हणता तू मंत्री झालास.आपण दोघांनीच तात्यासाहेबांचे पंचगंगेच्या घाटावर केलेले अस्थीविसर्जनही आठवते.बेंगलोरवरून ट्रकने गाई आणल्या,प्रवासात तू मी एकत्र होतो. पंचमीला काच लावून मांजा केला पण पतंग व काटाकाटी तूच करायचा,लहानपण भराभर सरले.”

“तू मोठा झाला,मंत्री झाला पण मनात प्रेमाचा हळवा कोपरा कायम जपलास. रोहीत दोन महिन्याचा होता,आपण एवढा लहान घेऊन तुझ्या हनिमूनला पूर्ण गाडी चालवत उटीला गेलेलो.त्याच रोहितला पहिल्या इलेक्शनला तू सांभाळलेस.जरी पक्ष म्हणून आपण वेगळे झालो तरी शेवट-शेवट त्याच्याशीच एकत्र येण्याविषयी,एकत्र काम करण्याबद्दल जवळकीने बोललास.कृषिकच्या उद्घाटनाला येऊन आठवणीने तुझ्या वहिनीच्या हातची आवडती भाजी व कवठ खाऊन नेहमीप्रमाणे मनापासून जेवणाला दाद देऊन गेलास,आवडले ते मनापासून बोलणारा तू. तू आज नाहीस,१९६४ च्या दरम्यान आपले चुलते वसंतदादांच्या अपघाती निधनाने पवार घराणे स्तब्ध झाले होते,तसेच आज तुझ्या जाण्याने झालेय.तुझ्या असण्याचा व नसण्याचा फरक सर्वांनाच प्रकर्षाने जाणवतोय.तू नाहीस हे जरी सत्य असले तरी तू येशील हा भास मात्र होत राहतो.मनापासून तुझी आठवण येतेय.तुझे अस्तित्व जाणवत राहते, “काय बंधू” म्हणून तुझ्या हाकेच्या सादेची मन कायम वाट पाहते..राजेंद्र पवार”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

NCP Sunetra Pawar Post : सुनेत्रा पवार यांची पोस्ट

आजोबा…
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला…
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात.
तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ…
आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही.
काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.
दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील…
माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम…!

हेदेखील वाचा

Comments are closed.