..तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलकांना मारहाण, हे पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा

सिंधुदुर्ग : चौथ्या स्तंभाबद्दल मला आदर आहे, अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) यांच्या माणसाने दिल्ली पोलिसांना मारहाण केली असं मी म्हणत नाही. मात्र, बाहेरून घुसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हे कृत्य केले आहे. म्हणूनच तो लाठीचार्ज झाला, हे पाप विरोधकांचे आहे. आंदोलनामध्ये घुसकोरी केली नसती तर लाठीचार्ज झाला नसता, असा वेगळाच दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. राजधानी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षाने सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला, तर सत्ताधारी पोलिसांची पाठराखण करत आहेत.

नीट पेपरफुटीवरुन सुरू असलेल्या आंदोलनातील अभिजीत दिपके आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आम्हाला शंभर टक्के आदरणीय सहानुभूती आहे. पण बाहेरून येऊन काहीजण नाटक करत आहेत, असे म्हणत उदय सामंत यांनी दिल्लीतील आंदोलनात विरोधक आपली माणसं घुसवत असल्याचा आरोपच त्यांनी केला. कोळसा, बोफोर्स किंवा टेलिकॉममध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून राजीनामा मागितला जात नाही. तर विद्यार्थ्यांचे जीव गेले, त्याची संवेदना म्हणून हा राजीनामा मागितला जात आहे. त्यांना टार्गेट करण्यापेक्षा सिस्टम सुधारली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी दिल्लीली आंदोलनावर दिली आहे.

दिल्लीतील नीट पेपरफुटीप्रकरणाच्या या आंदोलनामध्ये विरोधक स्वार झाले आहेत. एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम केलं जात आहे. या मंचावर आरएसएसला शिव्या घालण्याची गरज काय? ‘नीट’बाबत आता कोणीही बोलत नाही असं विद्यार्थी बोलत आहेत. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यापर्यंत हे गेले आहेत, हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे आणि बोलत आहे. आंदोलन यशस्वी होत असताना आपला यातून राजकीय फायदा होऊ शकतो त्याच भावनेतून सर्व एकत्र आले आहेत, असे म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. तर, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी विरोधकच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं.

जरांगे पाटील शुद्ध भावनेने आंदोलनस्थळी

मनोज जरांगे पाटील शुद्ध भावनेने आंदोलनस्थळी गेले आहेत, बाकीच्यांच्या भावना शुद्ध नव्हत्या. हा कधी खाली येतोय आणि मी कधी वर जातो अशा त्यांच्या भावना होत्या. एनडीएला बदनाम करण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी शोधून काढला आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटलं.

Comments are closed.