कूपरमधील एक्स-रे यंत्रणा बंद रुग्णांना आर्थिक भुर्दंड
पालिकेच्या कूपर रुग्णालयातील तीनही ‘क्ष’ किरण यंत्रणा बंद असल्याने रुग्णांना बाहेरून ही चाचणी करावी लागत आहे. काही रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पालिकेच्या विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात पश्चिम उपनगरातील शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येत असतात. मात्र या ठिकाणची ‘क्ष’ किरण यंत्रणा बंद असल्याने रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णांच्या सोयीसाठी तात्पुरती पोर्टेबल यंत्रणा वापरली जात आहे. मात्र या यंत्रावर काढण्यात येणाऱ्या एक्स-रेची संख्या अत्यंत कमी असल्याने मोठ्या संख्येने रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
गंभीर आजार आणि तातडीच्या आजारांवर वेळीच उपचार मिळण्यासाठी रुग्णांना खासगी यंत्रणांकडून एक्स-रे काढावे लागत आहेत. काही रुग्णांना यासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयातही पाठवले जात असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय प्रवासात रुग्णांना त्रासही होत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने या ठिकाणी तातडीने एक्स-रे सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
Comments are closed.