शालेय क्रिकेटची धुरा पुन्हा मेमन यांच्या खांद्यावर; एमएसएसएच्या सचिवपदी सलग सातव्यांदा बिनविरोध निवड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या शालेय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नदीम मेमन यांच्यावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटली आहे. मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या (एमएसएसए) क्रिकेट सचिवपदी त्यांची सलग सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. एमएसएसएच्या 134 व्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. गेली 14 वर्षे त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत शालेय क्रिकेटला नवी दिशा दिली आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य असलेले मेमन हे केवळ प्रशासक नाहीत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले क्युरेटर म्हणूनही त्यांची ओळख आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम, डी. वाय. पाटील स्टेडियम, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या खेळपट्टया तयार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

2012 मध्ये एमएसएसएच्या क्रिकेट सचिवपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मेमन यांनी शालेय क्रिकेट स्पर्धांना केवळ स्पर्धेचे स्वरूप न देता त्यात व्यावसायिकता आणि आकर्षकपणा आणला. एसजी क्रिकेटच्या सहकार्याने शालेय क्रिकेटपटूंना क्रिकेट किट, सामनावीर पुरस्कार आणि गिफ्ट व्हाऊचर्स देण्याची अभिनव परंपरा त्यांनी सुरू केली. त्यामुळे अनेक होतकरू क्रिकेटपटूंना मोठी प्रेरणा मिळाली.

Comments are closed.