खेळाडूंचाच आवाज आता कबड्डीच्या कारभारात
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने खेळाडूंच्या हक्कांना आणि प्रतिनिधित्वाला नवी ताकद देणारे ऐतिहासिक पाऊल उचलत खेळाडू आयोग (ऍथलीट कमिशन) स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. राष्ट्रीय क्रीडा अधिनियम 2025 आणि अखिल हिंदुस्थानी कबड्डी महासंघाच्या (एकेएफआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्थापन होणारा हा आयोग आता माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना थेट क्रीडा प्रशासनाचा भाग बनवणार आहे.
हिंदुस्थानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले, मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार विजेते किंवा राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते, किमान एक वर्षापूर्वी निवृत्त झालेले आणि 25 ते 70 वर्षे वयोगटातील माजी कबड्डीपटू या आयोगासाठी पात्र असतील.
राज्य कबड्डी संघटनेशी संलग्न जिल्हा संघटनांतील इच्छुक माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी 10 ऑगस्ट 2025 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज राज्य संघटनेच्या अधिकृत ई-मेलवर आणि दादर येथील मध्यवर्ती कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. आयोगात पुरुष आणि महिला खेळाडूंना समान प्रतिनिधित्व दिले जाणार असून निवड झालेल्या सदस्यांना राज्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिकृत सदस्यत्व आणि सर्व अधिकार मिळणार आहेत.
त्यामुळे राज्यातील सर्वोच्च कामगिरी केलेल्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पुढे येऊन कबड्डीच्या प्रशासनाला अधिक सक्षम आणि खेळाडूकेंद्री बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्रभारी सरकार्यवाह माधव गायकवाड यांनी केले आहे.
Comments are closed.